'मुंबई महापालिकेतील टक्केवारीसाठी ठाकरे बंधू एकत्र!'; संजय शिरसाटांचा घणाघाती प्रहार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 14:26 IST2025-12-23T14:23:03+5:302025-12-23T14:26:21+5:30
ज्यांचा जीव फक्त 'टक्केवारी'त अडकलाय, त्यांना जनतेची काय काळजी?

'मुंबई महापालिकेतील टक्केवारीसाठी ठाकरे बंधू एकत्र!'; संजय शिरसाटांचा घणाघाती प्रहार
छत्रपती संभाजीनगर: "ज्या नेत्यांना नगरपालिकेत प्रचारासाठी फिरायला वेळ नव्हता, त्यांचा जीव आज मुंबईत का अडकला आहे? कारण मुंबई महानगरपालिका म्हणजे यांच्यासाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. केवळ टक्केवारीच्या स्वार्थासाठी आणि मजबुरीतून ही युती झाली आहे," अशा शब्दांत शिंदेसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल केला. छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
संभाजीनगरमध्ये युतीचा पेच कायम?
स्थानिक पातळीवर भाजप आणि शिंदे सेना यांच्यातील युतीबाबत बोलताना शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली. "उपमुख्यमंत्री शिंदेंनी महायुतीचे स्पष्ट आदेश दिले आहेत, मात्र छत्रपती संभाजीनगरमधील काही लोकांना युती नको आहे असे दिसते. चार बैठका होऊनही काहींनी अवास्तव मागण्या केल्या आहेत. आज आम्ही अतुल सावे यांची भेट घेऊन अंतिम चर्चा करू, अन्यथा वरिष्ठ पातळीवरून हा निर्णय घेतला जाईल. आम्हाला भांडण उकरून काढायचे नाही, म्हणूनच आम्ही आजवर शांत आहोत," असे त्यांनी स्पष्ट केले.
खैरे आणि दानवेंवर टीकास्त्र
संजय शिरसाट यांनी अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांचा समाचार घेताना अत्यंत तिखट शब्द वापरले. "ज्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना उभी राहिली, त्याच पक्षात आता कुणाला तरी जपण्यासाठी 'मामू' होण्याची वेळ आली आहे. अनेकजण आज उबाठा सोडण्याच्या तयारीत आहेत. अंबादास दानवे ज्या एमआयएमच्या मतांवर बोलत आहेत, त्यांनी विचार करावा की अब्दुल सत्तार जेव्हा धनुष्यबाणासाठी लढले, तेव्हा तुमची भूमिका काय होती? आता तुमच्या डब्याला कुलूप लावण्याची वेळ आली आहे," असे शिरसाट म्हणाले.
उद्धव ठाकरेंची गल्लीत सभा घेण्याची वेळ!
मैदान बुकिंग आणि सभांच्या मुद्द्यावरूनही त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. "मैदानं बुक करून तिथे लोकं तरी आणा. आता गल्लीत सभा घेण्याची वेळ तुमच्यावर आली आहे. आम्ही काय करायचं हे आम्हाला चांगलं कळतं, म्हणूनच आमचा पक्ष पुढे चाललाय. तुमचा डबा रुळावरून घसरला असून आता फक्त काठावर बसून पाहण्याशिवाय तुमच्याकडे पर्याय उरलेला नाही," अशी टीका त्यांनी यावेळी केली.