भक्कम पाया! मराठवाड्यातील नगरसेवक, नगराध्यक्ष पुढे झाले आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 16:28 IST2025-11-25T16:25:46+5:302025-11-25T16:28:27+5:30
आतापर्यंत मराठवाड्यातील २५ नगरसेवक, नगराध्यक्ष पुढे झाले आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री

भक्कम पाया! मराठवाड्यातील नगरसेवक, नगराध्यक्ष पुढे झाले आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील ५२ नगर परिषदा आणि नगर पंचायतींची निवडणूक सध्या सुरू आहे. नगर परिषदेत नगरसेवक किंवा नगराध्यक्ष म्हणून काम केलेल्या अनेकांना पुढे आमदार आणि खासदार होण्याची संधी मिळाली आहे. त्यापैकी काहींनी केंद्रात आणि राज्यात मंत्रिपदही भूषविले आहे.
नांदेडचे पहिले नगराध्यक्ष असलेले दिवंगत ज्येष्ठ नेते शंकरराव चव्हाण यांच्या गळ्यात दोनवेळा राज्याच्या मुख्यमंत्री पदाची तसेच केंद्र सरकारमध्ये मंत्री म्हणून माळ पडली. लातूरचे नगराध्यक्ष राहिलेले शिवराज पाटील चाकूरकर यांनीही राज्यात आणि केंद्रात मंत्रिपद तसेच सातवेळा खासदारकी मिळवली. लोकसभा सभापती आणि नंतर पंजाबचे राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे. याशिवाय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अब्दुल सत्तार (सिल्लोड) आणि अनिल पटेल (पैठण) यांनाही राज्यात मंत्रिपद मिळाले. तर बीडचे पहिले नगराध्यक्ष द्वारकादास मंत्री पुढे खासदार झाले. गंगाखेडचे नगरसेवक राहिलेले सुरेश जाधव हे दोनवेळा परभणीचे खासदार म्हणून निवडून आले. यासह २५ जणांना राज्य विधानसभा आणि विधान परिषदेत लोकप्रतिनिधीत्त्व करण्याची संधी मिळाली. यातील पाथरीचे बाबाजानी दुर्राणी यांनी विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांत आपला आवाज बुलंद केला.
अशी मिळाली पदे : मुख्यमंत्री : १
केंद्रात मंत्री : २
राज्यात मंत्री : २
लोकसभा सभापती : १
खासदार : २
आमदार (विधानसभा) : २३
आमदार (विधान परिषद) : ३
छत्रपती संभाजीनगर जिल्हा :
गंगापूर : काँग्रेसचे ॲड. यमाजी सातपुते : १९५७ ते १९५८ एक वर्ष गंगापूर पालिकेचे नगराध्यक्ष होते.
१९६२ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर ते गंगापूर विधानसभेचे पहिले आमदार म्हणून निवडून आले होते.
वैजापूर :
१) दिवंगत आर. एम. वाणी : नगराध्यक्ष : १९८५ ते १९९५ (१० वर्षे) व १९९९, २००४ आणि २००९ असे सलग १५ वर्ष आमदार.
नगराध्यक्ष पदाच्या काळातील विकासकामे : स्मशानभूमी विकास, छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालय, रामराव नाना नाट्यगृह.
२) भाऊसाहेब पाटील चिकटगावकर : नगरसेवक १९९० मध्ये व २०१४ ते २०१९ या काळात आमदार होते.
पैठण नगरपालिका :
अनिल पटेल : नगरसेवक : १९७४, नगराध्यक्ष : १९८४, आमदार १९८९, १९९३ मध्ये राज्यमंत्री, १९९५ आमदार.
नगराध्यक्ष पदाच्या काळातील विकासकामे : शॉपिंग सेंटर, भाजी मार्केट, वाचनालय, कै. कावसांनकर स्टेडियमची निर्मिती. शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना.
सिल्लोड नगरपालिका :
अब्दुल सत्तार : नगरसेवक - १९९४ ते २००४
नगराध्यक्ष - १९९४ ते १९९६, १९९८ ते १९९९ आणि २००० ते २००१
विधान परिषद सदस्य - २००१ ते २००६.
विधानसभा आमदार - २००९, २०१४, २०१९, २०२४
कॅबिनेट मंत्री - २०१४, २०१९
नगराध्यक्ष पदाच्या काळातील विकासकामे - सिल्लोड शहरासाठी पाणीपुरवठा योजना आणली, न. प.ची उपजिल्हा रुग्णालयाची नवीन इमारत बांधली. शहरातील अंतर्गत रस्ते आणि गटारांची कामे केली.
नांदेड जिल्हा :
शंकरराव चव्हाण
नांदेड जिल्ह्यात राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले दिवंगत नेते शंकरराव चव्हाण यांचा नगराध्यक्ष ते मुख्यमंत्री असा प्रवास राहिला आहे. १९५६ साली शंकरराव चव्हाण हे नांदेडचे नगराध्यक्ष होते. शंकरराव चव्हाण यांना दोनवेळा राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविण्याची संधी मिळाली. २१ फेब्रुवारी १९७५ ते १६ मे १९७७ आणि १२ मार्च १९८६ ते २६ जून १९८८ असा त्यांचा कालावधी राहिला.
शंकरराव चव्हाण यांना राज्यातील महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या जायकवाडी धरणाचे शिल्पकार मानले जाते. जायकवाडीसह अनेक मोठ्या धरणांचे बांधकाम केले, ज्यामुळे मराठवाडा आणि इतर भागांमध्ये जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध झाल्या. प्रशासकीय कार्यक्षमता सुधारण्यासाठी धोरणे आखली. महाराष्ट्राच्या ‘सचिवालय’ या शब्दाचे नामांतर ‘मंत्रालय’ असे केले.
लातूर जिल्हा :
शिवराज पाटील चाकूरकर हे लातूरचे नगराध्यक्ष होते. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात लातूर नगरपालिकेतून केली आणि ३ वर्ष नगराध्यक्ष म्हणून काम केले.
दोनवेळा लातूरमधून आमदार झाले. महाराष्ट्रात राज्यमंत्री होते. त्यानंतर सातवेळा खासदार म्हणून निवडून आले. लोकसभा सभापती, केंद्रीय गृहमंत्री आणि पंजाबचे राज्यपाल यासारखी महत्त्वाची पदे भूषविली.
त्यांच्या नगराध्यक्ष पदाच्या काळात त्यांनी शहराच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक जडणघडणीत मोठे योगदान दिले. त्यांनी टाऊन हॉलमध्ये ग्रंथालय सुरू केले आणि त्यांच्याच काळात लातूरमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते.
उदगीर नगरपालिका -
स्व. चंद्रशेखर भाेसले दोनदा नगरसेवक आणि पाच वर्षे आमदार.
औसा नगरपालिका -
१. स्व. मल्लिनाथ महाराज - दोनदा नगराध्यक्ष - एकदा आमदार.
मल्लिनाथ महाराजांच्या काळात शहरात स्ट्रीट लाईट व नळ योजना कार्यान्वित झाली.
२. स्व. ॲड. शिवशंकरप्पा उटगे - एकदा नगराध्यक्ष - एकदा आमदार.
ॲड. शिवशंकरप्पा उटगे यांच्या कार्यकाळात विविध विकासकामे झाली.
बीड जिल्हा :
बीड नगरपालिका
१. द्वारकादास मंत्री : बीडचे पहिले नगराध्यक्ष म्हणून १९५२ पासून १५ वर्षे काम पाहिले. नंतर १९६२ मध्ये ते जिल्ह्याचे खासदार झाले. त्यांच्या कार्यकाळात शहरातील मूलभूत नागरी सुविधा निर्माण करण्यात आल्या.
२. सय्यद सलीम : बीड नगरपालिकेत १९९३ मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले. १९९८ मध्ये नगराध्यक्ष झाले. नंतर १९९९ मध्ये आमदार झाले. त्यांच्या कार्यकाळात माजलगाव बॅकवॉटर ही महत्त्वाकांक्षी योजना पूर्णत्वास आली.
गेवराई
शाहुराव पवार :
१. गेवराई नगरपालिका निवडणुकीत शाहुराव पवार नगरसेवक म्हणून विजयी झाले होते. ते पाच वर्ष नगराध्यक्ष होते. त्यानंतर आमदार झाले. त्यांच्या कार्यकाळात गेवराईतील नळ योजनेसह इतर कामे झाली.
२. माधवराव पवार : नगरसेवक होऊन पाच वर्ष नगराध्यक्ष राहिले. नंतर ते गेवराईचे आमदार झाले. त्या काळात त्यांनी शहरातील रस्ते, नाल्यांसह मूलभूत सुविधांची इतर कामे केली.
३. लक्ष्मण पवार : गेवराईचे नगरसेवक होऊन उपनगराध्यक्ष झाले. त्यांनतर नगराध्यक्ष व आमदार झाले. या काळात त्यांनी गेवराई शहरातील नगर परिषद इमारत, रस्ते, नाल्यांसह इतर विकासकामे केली.
अंबाजोगाई
पृथ्वीराज साठे :
अंबाजोगाई नगरपालिका निवडणुकीत पृथ्वीराज साठे हे दोनवेळा नगरसवेक म्हणून निवडून आले होते. अडीच वर्षे नगराध्यक्षपदी राहिले. २०१२ मध्ये झालेल्या केज विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत साठे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झाले होते. दोन वर्ष त्यांच्या वाट्याला आमदारकी आली.
परळी
लक्ष्मणराव देशमुख :
परळी येथील दिवंगत नेते लक्ष्मणराव देशमुख परळी नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष होते. नंतर त्यांना विधान परिषदेवर संधी मिळाली.
जालना जिल्हा :
जालना :
कैलास गोरंट्याल - ११९१ मध्ये नगरसेवक म्हणून विजयी. ११९३ मध्ये जालना मनपाचे नगराध्यक्ष. काँग्रेसकडून ११९९ मध्ये विधानसभा निवडणुकीत विजयी. २००९ मध्ये विधानसभा निवडणुकीत विजयी. २०१६ मध्ये पत्नी संगीता गोरंट्याल जनतेतून नगराध्यक्ष म्हणून राज्यातून सर्वाधिक ५३ हजार ६७८ मतांनी विजयी. २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत विजयी. नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात शहागड-अंबड-जालना पाणीपुरवठा योजना, शहरांतर्गत रस्त्यांसह इतर विविध विकासकामे.
परतूर -
सुरेशकुमार जेथलिया - १९९१ मध्ये नगरपालिकेचे नगरसेवक व १३ वर्षे नगराध्यक्ष. परतूर-मंठा विधानसभा मतदारसंघाचे दहा वर्षे आमदार. नंतर विधान परिषदेवरही त्यांची निवड झाली.
नगराध्यक्ष व आमदारकीच्या काळात त्यांनी परतूर शहरात शुद्ध पाणीपुरवठा योजना, भूमिगत गटार योजना, उड्डाणपूल, अग्निशमन दल, स्टेडियम, घनकचरा प्रकल्प, घंटागाड्यांसह शहरातील विविध रस्ते व इतर विकासकामे केली. जेथलिया यांच्या पत्नी विमल जेथलिया या नगराध्यक्ष होत्या, हे विशेष.
धाराशिव जिल्हा :
तुळजापूर-
स्व. माणिकराव खपले : १९६१ मध्ये पहिल्यांदा तुळजापूर पालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. १९७८ सालापर्यंत पालिकेत नगरसेवक ते नगराध्यक्ष. १९७८-८० या काळात शेकापकडून पहिल्यांदा आमदार. पुढे तीन वेळा आमदार.
- तुळजापूरवासीयांचा आग्रह लक्षात घेत छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा बसवून घेतला. तसेच तुळजापूर शहराच्या पाणीपुरवठ्याचे कामही त्यांच्या काळात मार्गी लागले.
उमरगा-
ज्ञानराज चौगुले : १९९६ साली पहिल्यांदा शिवसेनेकडून उमरगा पालिकेत नगरसेवक. २००१ मध्ये दुसऱ्यांदा नगरसेवक. २००९-१४ मध्ये शिवसेनेकडून विधानसभेला उमरगा मतदारसंघातून पहिल्यांदा संधी. सलग तीन वेळा आमदार म्हणून विजयी. २०२४ मध्ये चौथ्या वेळी पराभूत.
- नगरसेवक म्हणून काम करताना रस्ते, पाणी व मूलभूत सुविधा उभारल्या. पाणीपुरवठा सभापती म्हणून काम करताना पहिल्यांदाच शहरातील सर्व अवैध नळ कनेक्शन बंद केले. वाढीव वस्तीत नळयोजना पोहोचवली.
हिंगोली जिल्हा:
हिंगोली-
१. आ. संतोष बांगर - हिंगोली नगरपालिकेत एकवेळा नगरसेवक. त्यानंतर कळमनुरी विधानसभा मतदारसंघात २०१९ व २०२४ असे दोन टर्म शिवसेनेचे आमदार.
२. गजानन घुगे - हिंगोली नगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम. त्यानंतर कळमनुरी विधानसभा मतदार संघातून शिवसेनेतर्फे १९९९ व २००४ असे दोन टर्म आमदार.
परभणी जिल्हा :
पाथरी -
अब्दुला खान लतीफ खान दुर्राणी उर्फ बाबाजानी- पाथरी नगरपालिकेवर ४ वेळा नगरसेवक आणि चार वेळा नगराध्यक्ष. एक वेळा पाथरी विधानसभेतून तर दोन वेळा विधान परिषदेवर आमदार. सध्या ते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष.
नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात मेनरोड, सीसी रस्ते तसेच विद्युतीकरण, चार दशलक्ष लिटरची पाण्याच्या जलकुंभाची उभारणी झाली. शहरामध्ये विद्युतीकरण आणि जुना बस स्टँडवर शॉपिंग सेंटरचे बांधकाम केले.
जिंतूर-
१. विजय भांबळे - जिंतूर नगरपालिकेत १९९० ला काँग्रेसच्या तिकिटावर नगरसेवक. पुढे राष्ट्रवादीकडून २०१४ साली आमदार.
२. रामप्रसाद बोर्डीकर- रामप्रसाद बोर्डीकर हे सन १९७५ ला जिंतूर नगरपालिकेत नगरसेवक होते. यानंतर पुढे ते १९९० काँग्रेसचे आमदार झाले. यानंतर पाच वेळेला आमदार म्हणून जनतेने विश्वास दाखविला.
गंगाखेड नगरपालिका
१. सुरेश जाधव - १९९२ च्या कालावधीत गंगाखेड नगरपालिकेत नगरसेवक. पुढे १९९५ व १९९९ ला ते शिवसेनेकडून परभणी लोकसभा मतदारसंघाचे खासदार.
२. रतनलाल तापडिया - गंगाखेड पालिकेचे सलग दहा वर्ष नगराध्यक्षपद भूषविले. १९८७-१९९३ या कालावधीत परभणी- हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात काँग्रेसकडून आमदार. तापडिया यांच्या कार्यकाळात गंगाखेड शहरात व्यापार संकुले बांधली.
३. डॉ. मधुसूदन केंद्रे - २००१ च्या निवडणुकीत गंगाखेड नगरपालिकेत थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी. पुढे नगरसेवक म्हणूनही निवडून आले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाले.
नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात शहराच्या विकासाला चालना दिली.
हे झाले खासदार
शंकरराव चव्हाण (नांदेड), द्वारकादास मंत्री (बीड), शिवराज पाटील चाकूरकर (लातूर), सुरेश जाधव (परभणी)
हे झाले मंत्री
केंद्रीय : शंकरराव
चव्हाण, शिवराज पाटील चाकूरकर
राज्यात : शंकरराव
चव्हाण, शिवराज पाटील चाकूरकर, अब्दुल सत्तार, अनिल पटेल