गणेश मंडळांना दिलासा; आता धर्मादायमध्ये एकदाच करा कायमस्वरूपी नोंदणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 13:22 IST2025-07-25T13:21:09+5:302025-07-25T13:22:09+5:30

धर्मादायमध्ये एकदाच कायमस्वरूपी नोंदणी करा; धर्मादाय सहआयुक्तांचे आवाहन

Relief for Ganesh Mandals; Now register once for permanent charity | गणेश मंडळांना दिलासा; आता धर्मादायमध्ये एकदाच करा कायमस्वरूपी नोंदणी

गणेश मंडळांना दिलासा; आता धर्मादायमध्ये एकदाच करा कायमस्वरूपी नोंदणी

छत्रपती संभाजीनगर : सार्वजनिक गणेश मंडळाने एकदा धर्मादाय सहआयुक्त कार्यालयात कायमस्वरूपी नोंदणी केल्यानंतर दरवर्षी या कार्यालयात पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. यासंदर्भात धर्मादाय सहआयुक्तांनी गुरुवारी पत्रक जारी केले आहे.

महाराष्ट्राचा उत्सव गणेशोत्सवाला २७ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. सार्वजनिक गणेश मंडळ असो किंवा सोसायटीतील गणेश मंडळ, ते आता कामाला लागले आहेत. काही मंडळांची बैठक होऊन कार्यकारिणीही निवडण्यात आली, तर काही मंडळ आगामी १५ दिवसांत कार्यकारिणी निवडणार आहेत.

परवानगीचा गणेशोत्सव
गणेश मंडळ असो वा दुर्गा उत्सव मंडळ, त्यांना वर्गणी जमा करण्यासाठी प्रथम धर्मादाय सहआयुक्त कार्यालयाची परवानगी घ्यावी लागते. तसेच ज्या ठिकाणी गणपतीची स्थापना केली जाते, त्या जागेच्या मालकाची परवानगी, महानगरपालिका, पोलिस आयुक्त आणि महावितरणकडून वीजपुरवठ्याची सुविधा घेण्यासाठी परवानगी मिळवावी लागते. या सर्व परवानग्या दरवर्षी घ्याव्या लागतात.

कायमस्वरूपी नोंदणीचा पर्याय
महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० च्या कलम ४१(क) अंतर्गत गणेश मंडळांना आणि दुर्गा उत्सव मंडळांना वर्गणी जमा करण्यासाठी धर्मादाय सहआयुक्त कार्यालयातून परवानगी घ्यावी लागते. मात्र, संस्था नोंदणी अधिनियम अंतर्गत कायमस्वरूपी नोंदणी केल्यास दरवर्षी धर्मादायमध्ये नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. यासाठी मंडळांनी कायमस्वरूपी नोंदणी करावी, असे आवाहन धर्मादाय सहआयुक्त राजेश पावसकर यांनी केले आहे.

एक खिडकी योजना करावी
दरवर्षी सार्वजनिक गणेश मंडळांना विविध सरकारी कार्यालयांची परवानगी घ्यावी लागते. यामध्ये वेळ आणि पैसा वाया जातो. म्हणून सर्व परवानग्या एका ठिकाणी मिळाल्या, तर मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना दिलासा मिळेल. धर्मादाय सहआयुक्त कार्यालयात कायमस्वरूपी नोंदणीचा निर्णय चांगला आहे. मात्र, पोलिस आयुक्तालय, महानगरपालिका आणि महावितरण यांची परवानगी घेणे मात्र त्या कार्यालयात जाऊनच करावे लागणार आहे.
- लक्ष्मीनारायण राठी, सचिव, न्यू सार्वजनिक गणेश मंडळ, गांधी पुतळा चौक, शहागंज

Web Title: Relief for Ganesh Mandals; Now register once for permanent charity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.