छ. संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक थांबेना! मंत्र्यांच्या गाड्यांना काळं फासलं, घोषणाबाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 11:49 IST2025-12-31T11:47:18+5:302025-12-31T11:49:48+5:30
Chhatrapati Sambhajinagar Election 2026 BJP Rift: एका कार्यकर्त्याने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

छ. संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक थांबेना! मंत्र्यांच्या गाड्यांना काळं फासलं, घोषणाबाजी
छत्रपती संभाजीनगर: महायुती तुटल्यानंतर छत्रपती संभाजीनगर भाजपमध्ये उमेदवारी वाटपावरून सुरू असलेला गृहकलह आता नियंत्रणाबाहेर गेला आहे. मंगळवारी रात्री भाजपच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयासमोर संतप्त कार्यकर्त्यांनी अभूतपूर्व गोंधळ घातला. यावेळी कार्यकर्त्यांनी माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांची गाडी रोखून धरली, तर कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या गाडीला काळे फासून आपला तीव्र निषेध नोंदवला. याचवेळी प्रशांत भदाने या कार्यकर्त्याने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. यावेळी पोलिस संरक्षणात सावे आणि कराड यांनी काढता पाय घेतला.
नेत्यांच्या पीएला तिकीट, कार्यकर्त्यांना काय?
"मी सर्वेक्षणात आघाडीवर होतो, रात्रंदिवस पक्षासाठी झटलो, पण साहेबांनी त्यांच्या पीएला तिकीट देऊन माझा घात केला," असा आरोप प्रशांत भदाने पाटील या संतप्त कार्यकर्त्याने केला. "मला अंधारात ठेवले गेले, आता जर मला काही झाले तर त्याला नेतृत्व जबाबदार असेल," असा इशाराही त्याने दिला. तसेच कराड यांनी जातीवर आणि सावे यांनी त्यांच्या पीएला नातेवाईकांना तिकीट दिल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. दुसरीकडे, उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेल्या सुवर्णा मराठे यांनी कडाक्याच्या थंडीत प्रचार कार्यालयातच आमरण उपोषण सुरू केले आहे.
महिला कार्यकर्त्या आक्रमक; शितोळेंना धरलं धारेवर
पक्षाच्या वरिष्ठ महिला कार्यकर्त्यांनी शहराध्यक्ष किशोर शितोळे यांची घेराबंदी केली. "जुन्या कार्यकर्त्यांना पदाधिकारी म्हणून डावलले जाते आणि केवळ शिस्तीच्या नावाखाली आमचा बळी दिला जातो," असा आरोप महिलांनी केला. दिव्या मराठे यांनी थेट आव्हान देत म्हटले की, "चार-चार वेळा ठराविक लोकांनाच तिकीट दिले जाते. आम्हाला आधी प्रचार करायला सांगता आणि मग डावलता. आता हकालपट्टी केली तरी चालेल, पण अन्याय सहन करणार नाही."
नेत्यांचा सावध पवित्रा
शहराध्यक्ष किशोर शितोळे यांनी कार्यकर्त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र संताप इतका होता की कोणाचेही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत कोणी नव्हते. शितोळे यांनी "शिस्तभंग खपवून घेतला जाणार नाही," असे म्हटले असले तरी, निष्ठावंतांच्या या उठावामुळे भाजपच्या विजयाच्या गणितांना सुरुंग लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भाजपच्या १५ उमेदवारांनी पक्षादेश डावलून उमेदवारी भरली
तसेच त्यांनी पक्ष कार्यालयात राडा देखील केला. त्या सर्व नाराजांशी शहराध्यक्ष किशोर शितोळे यांनी बुधवारी सायंकाळी पक्ष कार्यालयात चर्चा केली. १५ जणांचे बंड शांत होईल, त्यांनी भरलेला उमेदवारी अर्ज ते मागे घेतील, असा दावाही शितोळे यांनी केला. भाजपत नाराजांची संख्या प्रचंड आहे. याचाच अर्थ भाजप हा जिवंत पक्ष आहे. इथे एका जागेसाठी लढणारे दहा-बारा जण होते, त्यामुळे स्वाभाविकच नाराजी असणं समजू शकतो; परंतु विरोधकांकडे उमेदवार नाहीत. त्यामुळे विरोधकांकडे नाराजी होण्याचा प्रश्नच नव्हता. भाजप हे कुटुंब आहे, इथे नाराजी घरात येऊन आपल्या जिल्हाध्यक्षाकडे व्यक्त करणे यात गैर काहीच नाही.