छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 19:34 IST2025-12-26T19:32:44+5:302025-12-26T19:34:20+5:30
तिकीट वाटपावरून एमआयएमच्या अधिकृत उमेदवारावर रॅलीत पक्षाच्या कार्यकर्त्यांनीच केला हल्ला; किराडपुऱ्यात तणावपूर्ण शांतता

छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
छत्रपती संभाजीनगर: शहरातील एमआयएम पक्षातील अंतर्गत धुसफूस आता रस्त्यावर आली आहे. एमआयएमने महापालिकेसाठी दोन दिवसांपूर्वीच जाहीर केलेल्या आठ उमेदवारांच्या यादीवरून पक्षात मोठे बंड पाहण्यास मिळत आहे. प्रभाग क्रमांक १२ मधील अधिकृत उमेदवाराने शुक्रवारी सायंकाळी काढलेल्या रॅलीवर पक्षातीलच नाराज गटाच्या समर्थकांनी हल्ला केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
आनंदाच्या मिरवणुकीत 'विघ्न'
एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी दोन दिवसांपूर्वी आठ उमेदवारांची घोषणा केली होती. या यादीमुळे अनेक इच्छुकांचे पत्ते कट झाल्याने नाराजी पसरली होती. प्रभाग १२ चे अधिकृत उमेदवार शुक्रवारी सायंकाळी ५:३० वाजता किराडपुरा भागातून रॅली काढत असताना, राममंदिर रोडवर ही दुर्घटना घडली. एका माजी नगरसेवकाचे समर्थक तिथे आले आणि त्यांनी अचानक रॅलीवर हल्ला चढवला.
उमेदवाराला मारहाण अन् गंभीर इशारा
रॅली मंदिराजवळ पोहोचताच घोषणाबाजी सुरू झाली आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. संतापलेल्या समर्थकांनी केवळ रॅली उधळली नाही, तर अधिकृत उमेदवारालाही मारहाण केली. "पक्षाने या उमेदवारीचा फेरविचार करावा, अन्यथा किराडपुरा भागातून एमआयएमचे नाव संपवून टाकू," असा टोकाचा इशारा यावेळी देण्यात आला. हल्ल्याची तीव्रता पाहून उमेदवाराला हार-तुरे बाजूला ठेवून समर्थकांसह तिथून सुरक्षित स्थळी धाव घ्यावी लागली.
पोलिसांची वेळीच मध्यस्थी
घटनेची माहिती मिळताच जिन्सी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असून तणाव निवळला आहे. मात्र, उशिरापर्यंत या भागात दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. निवडणुकीच्या तोंडावर आपल्याच पक्षात झालेल्या या बंडखोरीमुळे एमआयएमसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.