छत्रपती संभाजीनगरात सार्वजनिक गणेश मंडळांचा भक्तांसाठी २ कोटींचा भंडारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 20:02 IST2025-09-04T20:02:49+5:302025-09-04T20:02:58+5:30
गणेशोत्सव : ९ लाख पत्रावळी; डाळबट्टीसाठी ४५ टन गव्हासह बासमती व सोनास्टीम तांदळाची खरेदी

छत्रपती संभाजीनगरात सार्वजनिक गणेश मंडळांचा भक्तांसाठी २ कोटींचा भंडारा
छत्रपती संभाजीनगर : गणेशोत्सवाचा उत्साह आता शिगेला पोहोचला आहे. एकीकडे नागरिकांनी देखावे पाहण्यासाठी बुधवारी गर्दी केली होती. तर दुसरीकडे सार्वजनिक गणेश मंडळांकडून जागोजागी द्रोणांद्वारे प्रसादाचे वाटप केले जात होते. पुढील २ दिवसांत प्रत्येक सार्वजनिक गणेश मंडळाने सत्यनारायणाची पूजा व भंडाऱ्याचे आयोजन केले आहे. आतापर्यंत सुमारे २ कोटींची उलाढाल या भंडाऱ्याच्या सामानात झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
यंदा शहरात लहान-मोठ्या सुमारे ९०० गणेश मंडळांनी गणेशमूर्तींची स्थापना केली आहे. त्यातील ५०० गणेश मंडळांमध्ये सत्यनारायणाची पूजा केली जाणार आहे. लगेच भंडाऱ्याच्या पंगती बसतील. २५ ते ३० मोठे सार्वजनिक गणेश मंडळ असे आहेत की, ते दररोज सायंकाळच्या आरतीनंतर द्रोणांमध्ये कधी तांदळाची कधी साबुदाणाची खिचडी असे ८ दिवस वेगवेगळे प्रसाद वाटप करीत आहेत. यासाठी ९ लाख पत्रावळी, १२ लाख द्रोण, १० लाख पाण्याच्या ग्लासची आतापर्यंत विक्री झाली आहे.
राजाबाजारात ६ लाखांचा भंडारा
संस्थान गणपती मंदिर ट्रस्टच्यावतीने गणेशोत्सवात ९ दिवस अन्नदान करण्यात येते. यासाठी सुमारे ६ लाखांपर्यंत खर्च येते आहे. ९ दिवसांच्या अन्नदानाची ६ दशकांच्या परंपरेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काही गणेश मंडळांनी अन्नदानास सुरुवात केली आहे.
पुलावसाठी बासमती, मसाला भातसाठी सोनास्टिम
गणेशोत्सवात भंडाऱ्यामध्ये पुलाव किंवा मसालाभात आर्वजून केले जातात. यात पुलाव मोकळा होण्यासाठी लांब दाण्याचा बासमती तांदळाचा वापर करतात. तर मसालाभातासाठी सोनास्टिम हा तांदूळ वापरला जातो. गणेशोत्सवात ४५ ते ५० टन तांदळाची विक्री होते. सत्यनारायणाच्या पूजेच्या वेळी शिऱ्याचा प्रसाद दिला जातो. यासाठी १० टन रव्याची विक्री झाली.
डाळबट्टी व गुलाबजामूनचा बेत
आजही अनेक ठिकाणी भंडाऱ्यात बुंदी दिली जाते. मात्र, मागील ४ ते ५ वर्षांपासून गुलाबजामूनला मागणी वाढत आहे. बुंदी-बेसन १० टन, साखर १० टन, सोयाबीन तेल किंवा सरकी तेल २५ टन, डाळबट्टीसाठी मका ६ टन, गहू ४५ टन, गुलाबजामून पावडर ६० टन विक्री झाल्याचे व्यापाऱ्यांनी नमूद केले.
दररोज ७० ते ८० हजार खर्च
अष्टांगहृदय गणेश मंडळाने मुकुंद गोलटगावकर यांच्या सहकार्याने म्हैसूर विष्णू मंदिराचा देखावा साकारला आहे. आम्ही दररोज सायंकाळाच्या आरती नंतर महाप्रसादाचे वाटप करतो. त्यासाठी दररोज ६० ते ७० हजार रुपयांचा खर्च येतो.
- मनोज वडगावकर, संस्थापक अध्यक्ष, अष्टांगहृदय गणेश मंडळ
सत्यनारायण पूजेसाठी दोन दिवस
गणेशमूर्तींचे विसर्जन शनिवारी ६ तारखेला होणार आहे. त्याआधी म्हणजे गुरुवारी (दि.४ ) व शुक्रवारी (दि.५) या दोन तारखेपैकी एक दिवस सत्यनारायणाची पूजा करता येईल. यसाठी ५ केळीचे खांब, विड्याचे पान, खारीक, खोबरे, लाल सुपारी, हळदकुंड, खडीसाखर, तुळशीची पाने, विड्याची पाने, पूजा मांडण्यासाठी लागतात. तसेच काही ठिकाणी श्री सत्यविनायकाचीही पूजा केली जाते.
- सुरेश केदारे गुरुजी