उमेदवारासह जाणाऱ्या पाच जणांसाठी ८७ पोलिसांचा बंदोबस्त; रस्ता बंद, सामान्य जनता मेटाकुटीस

By विकास राऊत | Published: April 19, 2024 12:48 PM2024-04-19T12:48:06+5:302024-04-19T12:54:20+5:30

छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारा रस्ता बंद; रहिवाशांना लांबून वळसा घालून जावे लागले घरी

Provision of 87 policemen for five persons accompanying the candidate of Loksabha ; Road closure, general public facing trouble | उमेदवारासह जाणाऱ्या पाच जणांसाठी ८७ पोलिसांचा बंदोबस्त; रस्ता बंद, सामान्य जनता मेटाकुटीस

उमेदवारासह जाणाऱ्या पाच जणांसाठी ८७ पोलिसांचा बंदोबस्त; रस्ता बंद, सामान्य जनता मेटाकुटीस

छत्रपती संभाजीनगर: लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास गुरूवारी सुरूवात झाली. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाला कडेकोट पोलिस बंदोबस्त लावला आहे. सहायक पोलिस आयुक्तांसह २ पोलिस निरीक्षक, ११ उपनिरीक्षक, ५५ पुरूष तर १८ महिला पोलिस अंमलदार यासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. उमेदवारासह ५ जणांना जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश असणार आहे. त्यासाठी शेकडो पाेलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला असून १८ ते २९ एप्रिलदरम्यान सकाळी ९:०० ते सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत चांदणे चौक, जिल्हाधिकारी कार्यालय ते विभागीय आयुक्त निवासस्थान टी हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद केल्याने सामान्यांना त्रास सहन करावा लागला. रहिवाशांना लांबून वळसा घालून जावे लागले घरी जावे लागले.

नागरिकांचे मत काय?
सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत वाहतुकीस मार्ग बंद ठेवणे ठीक आहे. परंतु सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मार्ग बंद ठेवल्यामुळे घराकडे जाण्यासाठी लांबून जावे लागते आहे तसेच पोलिसांशी हुज्जत घालावी लागते आहे. निर्धारित वेळ संपल्यानंतर वाहतूक सुरळीत ठेवली पाहिजे.

अधिकाऱ्यांची वाहने रोखली
पोलिसांनी निवडणूक कामावर असलेल्या सहायक निवडणूक अधिकाऱ्यांची वाहने देखील रोखली. एका एआरओने पोलिसांशी हुज्जत घातली. त्यानंतर त्यांना वाहनासह आत सोडले. नाव न सांगण्याच्या अटीवर एका उपजिल्हाधिकाऱ्याने पोलिसांसोबत वाद झाल्याचे सांगितले.

जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले
जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप स्वामी यांनी तक्रारी आल्यानंतर पोलिस यंत्रणेचा खरपूस समाचार घेत, प्रमुख अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. अत्यावश्यक सेवेसाठी रस्ता मोकळा करून द्या. तसेच ज्यांची घरे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आहेत, त्यांना ये-जा करतांना त्रास देऊ नका, असे आदेशित केले. आचारसंहिता लागल्यापासून सगळी यंत्रणा डोळ्यात तेल घालून परिश्रम घेत आहेत. कुठेही गालबोट लागू नये, यासाठी सर्वांनी काम करावे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

त्या चौकात झाला असता अपघात
चांदणे चौक ते अण्णाभाऊ साठे चौक मार्गावर दुपारी महावितरणची केबल तुटून पडली. केबल तुटल्यानंतर ती रस्त्यावर पडली. वाहतूक तुरळक असल्यामुळे मोठा अनर्थ टळला. रणरणते ऊन, रस्ते बंद, पोलिसांचा बंदोबस्त असे चित्र जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात होते. सामान्य नागरिकांना पोलिसांच्या अरेरावीचा सामना करावा लागला.

Web Title: Provision of 87 policemen for five persons accompanying the candidate of Loksabha ; Road closure, general public facing trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.