'अश्रू, आक्रोश अन् उद्रेक'; तिकीट नाकारल्याने निष्ठावंतांचा संभाजीनगर भाजप कार्यालयात राडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 13:24 IST2025-12-30T13:22:58+5:302025-12-30T13:24:11+5:30
संभाजीनगर भाजपमध्ये निष्ठेचा 'बळी'! महिला कार्यकर्त्यांचा कार्यालयात आक्रोश

'अश्रू, आक्रोश अन् उद्रेक'; तिकीट नाकारल्याने निष्ठावंतांचा संभाजीनगर भाजप कार्यालयात राडा
छत्रपती संभाजीनगर: महायुती तुटल्यानंतर आता भाजपमध्ये उमेदवारी वाटपावरून अंतर्गत वणवा पेटला आहे. वर्षानुवर्षे पक्षाचा झेंडा खांद्यावर घेणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून 'आयात' उमेदवारांना झुकते माप दिल्यामुळे आज भाजपच्या प्रचार कार्यालयात संतापाचा मोठा उद्रेक झाला. प्रभाग १९ आणि २२ मधील इच्छुक महिला उमेदवारांनी अक्षरशः अश्रू ढाळत भावना व्यक्त केला. तर काही नाराज कार्यकर्त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिल्याने कार्यालयातील वातावरण अत्यंत तणावपूर्ण झाले होते.
संध्या कापसे यांना अश्रू अनावर
प्रभाग १९ मधून उमेदवारीसाठी प्रयत्नशील असलेल्या जुन्या कार्यकर्त्या संध्या कापसे यांनी नेत्यांना जाब विचारला. "नेहमी सांगता की कामाला लागा, काम चांगलं आहे, मग तिकीट वाटप करताना दुसऱ्यांना का आणता? आम्ही फक्त कामच करायचं का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सर्वसाधारण प्रवर्गाची जागा असताना ओबीसी महिलेला आयात करून निष्ठावंतांचा गळा घोटला जात असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
४१ वर्षांची निष्ठा आणि आत्मदहनाचा इशारा
प्रभाग २२ मधील महिला सुवर्णा बताडे तर टोकाची भूमिका घेत आत्मदहनाचा इशारा दिला. "लहान मुले असताना घरादाराची पर्वा न करता पक्षाचे काम केले, लाखो रुपये खर्च केले आणि आज गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना तिकीट दिले जात आहे," असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. तर एका ज्येष्ठ कार्यकर्त्याने, "४१ वर्षे पक्षाची सेवा केली, पण ज्यांना आम्हीच नेते म्हणून फिरवले त्यांना तिकीट देऊन आमचा अपमान केला," अशा भावना व्यक्त केल्या.
नोकरी सोडली, पण न्याय मिळाला नाही
एका कार्यकर्त्याने नोकरीवर पाणी सोडून भाजप वाढवल्याचे सांगताना, "बाहेरून आलेल्यांना तिकीट दिले जात आहे आणि आम्हा जुन्यांना डावलले जात आहे," असे म्हणत नेत्यांवर टीका केली. कार्यालयातील हा राडा वाढत गेल्याने अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, सावे, कराड आणि शितोळे यांच्याविरोधात कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी असून ही बंडाळी भाजपला निवडणुकीत महागात पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.