७१ उमेदवारांमधून एकच विजयी; छत्रपती संभाजीनगरात ‘काँग्रेस’ला आत्मचिंतनाची गरज
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 11:54 IST2026-01-17T11:53:33+5:302026-01-17T11:54:27+5:30
२०१७ मध्ये काँग्रेसचे १२ उमेदवार निवडून आले होते. आता केवळ एकच उमेदवार विजयी झाला आहे.

७१ उमेदवारांमधून एकच विजयी; छत्रपती संभाजीनगरात ‘काँग्रेस’ला आत्मचिंतनाची गरज
छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने लढविलेल्या ७१ पैकी अवघ्या एकाच जागी विजय मिळाला आहे. हा विजयसुद्धा संबंधित उमेदवाराच्या बळावर मिळालेला असून, पक्षाच्या अन्य उमेदवारांची विदारक स्थिती झाल्याचे दिसून आले. ढिसाळ नियोजन, विस्कळीतपणा, नेतृत्वाची वानवा असल्यामुळे काँग्रेसचा दारुण पराभव झाला. त्यामुळे आता काँग्रेसला अस्तित्व टिकविण्यासाठी आत्मचिंतनाची गरज निर्माण झाली आहे.
महापालिका निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर भाजप, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम, वंचित, राष्ट्रवादी (अजित पवार)तर्फे प्रभागनिहाय आढावा घेत उमेदवारांची चाचपणी केली होती. त्यात काँग्रेस पक्ष सगळ्याच आघाड्यांवर मागे होता. प्रभागनिहाय उमेदवारही पक्षाला मिळत नव्हती. ऐनवेळी तब्बल ७१ उमेदवारांना बी फॉर्म देण्यात आले. त्यानंतर पक्षाकडून उमेदवारांना कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही. त्याशिवाय बहुजन वंचित आघाडीसोबत युतीची बोलणी फिस्कटल्यामुळे पक्षाने स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारून घेतल्याचे स्पष्ट झाले. स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतानाच काही उमेदवारांच्या प्रचार कार्यालयांचे उद्घाटन करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आले होते. त्यानंतर खा. डॉ. कल्याण काळे यांनी काही रॅली, कॉर्नर बैठका घेतल्या.
शहराध्यक्ष शेख युसूफ यांचे चिरंजीव प्रभाग क्रमांक तीनमध्ये लढत होते. त्यामुळे त्यांनाही इतर ठिकाणी जास्त जाता आले नाही. प्रत्येक उमेदवाराने कुवतीनुसार प्रचार केला. मात्र, भाजप, एमआयएम आणि वंचितच्या प्रभावामुळे काँग्रेसचे उमेदवार सगळीकडे निष्प्रभ झाल्याचे दिसून आले. अपवाद फक्त प्रभाग क्रमांक १४ मध्ये कुरैशी मलेका बेगम यांचा होता. त्यांच्या विरोधातील एमआयएमच्या उमेदवाराने माघार घेतल्यामुळे त्यांचा विजय सोपा झाला. २०१७ मध्ये काँग्रेसचे १२ उमेदवार निवडून आले होते. आता केवळ एकच उमेदवार विजयी झाला आहे.