अरे, आवाज कोणत्या शिवसेनेचा ? शिवसेना विरुद्ध शिवसेनेच्या लढाईत कोण ठरणार वरचढ?

By नंदकिशोर पाटील | Published: April 23, 2024 12:25 PM2024-04-23T12:25:09+5:302024-04-23T12:26:25+5:30

लोकशाहीच्या या उत्सवातील हे विसंगत चित्र मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणारे किंबहुना चीड आणणारे आहे.

Oh, the voice of which Shiv Sena? Who will won in Shiv Sena vs Shiv Sena battle? | अरे, आवाज कोणत्या शिवसेनेचा ? शिवसेना विरुद्ध शिवसेनेच्या लढाईत कोण ठरणार वरचढ?

अरे, आवाज कोणत्या शिवसेनेचा ? शिवसेना विरुद्ध शिवसेनेच्या लढाईत कोण ठरणार वरचढ?

छत्रपती संभाजीनगर : अठराव्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने अनेक अकल्पित, अतार्किक आणि अविश्वसनीय अशा राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. कालपरवापर्यंत जे एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसले होते, जे एका ताटात जेवत होते, एकमेकांच्या गळ्यात गळे घालून फिरत होते, कौटुंबिक सोहळ्यात एकाच फ्रेममध्ये दिसून येत होते, तेच आता एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून उभे आहेत! कालचे मित्र, शत्रू झाले असून, काल जे शत्रू पक्षात होते तेच आज मित्रपक्षात आले आहेत!! 

लोकशाहीच्या या उत्सवातील हे विसंगत चित्र मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणारे किंबहुना चीड आणणारे आहे. शिवसेनेचेच उदाहरण घ्या. स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेची दोन शकले होतील आणि तेच एकमेकांच्या विरोधात दंड थोपटतील, अशी कल्पना तरी कोणी केली होती का? शिवसेनेत आजवर अनेकांनी बंड केले. पण, ते सगळे इतर पक्षांच्या वळचणीला गेले. राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले; पण त्यांनी सेनेवर वारसा हक्क न सांगता महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाने स्वतंत्र पक्ष काढला. पाच वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे भाजपसोबत निवडणुकीला सामोरे गेले. मोदींचे गोडवे गात त्यांनी काँग्रेस पक्षावर सडकून टीका केली होती. आज ठाकरे काँग्रेस सोबत आहेत, तर शिंदे भाजपसोबत जाऊन ठाकरेंवर टीका करीत आहेत ! 

राज्यातील सत्तांतर नाट्यानंतर शिवसेनेत उभी फूट पाडली. एका शिवसेनेच्या दोन शिवसेना झाल्या. दोन्ही पक्ष एकमेकांविरुद्ध लढत आहेत. राज्यातील २५ टक्के जागांवर उद्धवसेना विरुद्ध शिंदेसेना अशीच लढती होत आहेत. मराठवाड्यात औरंगाबाद आणि हिंगोली या दोन जागांवर दोन्ही सेनेत थेट सामना होत आहे. महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे औरंगाबाद, उस्मानाबाद, परभणी आणि हिंगोली अशा चार जागा, तर महायुतीत शिंदेसेनेकडे हिंगोली आणि औरंगाबाद अशा दोनच जागा मिळाल्या आहेत. औरंगाबादची जागा पदरात पाडून घेण्यासाठी महिनाभर प्रयत्न करावे लागले.

दोन खासदार, तीन आमदार
शिवसेनेतील फुटीनंतर बहुसंख्य खासदार आणि आमदार शिंदे यांच्यासोबत गेले. मात्र, मराठवाड्यातील संजय ऊर्फ बंडू जाधव (परभणी) आणि ओमराजे निंबाळकर (उस्मानाबाद) हे दोन्ही खासदार ठाकरे यांच्या सोबत राहिले, तर हिंगोलीचे हेमंत पाटील शिंदेसोबत गेले. मराठवाड्यात शिवसेनेचे (एकत्रित) अकरा आमदार आहेत. पैकी उदयसिंह राजपूत (कन्नड), डॉ. राहुल पाटील (परभणी) आणि कैलास पाटील (उस्मानाबाद) हे तीन आमदार वगळता उर्वरित आठजण शिंदे यांच्यासोबत आहेत. शिंदे यांच्या बंडाला मराठवाड्यातून मोठे पाठबळ मिळाल्याने त्याची बक्षिसी म्हणून संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार आणि तानाजी सावंत या तिघांना मंत्रिपदे मिळाली.

उमेदवार तुल्यबळ
ज्या तीन जागांवर दोन्ही सेनेत थेट लढती होत आहेत, तिथे दोन्हीकडेचे उमेदवार तसे तुल्यबळ आहेत. औरंगाबादेत माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात रोहियो मंत्री संदीपान भुमरे यांना मैदानात उतरविले आहे. चार टर्म खासदार, राज्यात मंत्री राहिलेले खैरे यांचा २०१९च्या निवडणुकीत अवघ्या चार हजार मतांनी निसटता पराभव झाला होता. अपक्ष हर्षवर्धन जाधव मैदानात नसते तर खैरेच निवडून आले असते. खैरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत निकटवर्ती होते. निष्ठावान शिवसैनिक म्हणून ते ओळखले जातात. म्हणून शिवसेना फुटीनंतरही ते ठाकरे यांच्यासोबत राहिले. मंत्री भुमरे हेदेखील ज्येष्ठ आहेत. आमदारकीची त्यांची ही पाचवी टर्म आहे. मात्र, त्यांचा पैठण विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभेत येतो. त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नाही. परभणीत उद्धव सेनेचे संजय जाधव विरुद्ध रासपाचे महादेव जानकर अशी लढत होत आहे. जाधव हे विद्यमान खासदार असून, जानकर हे या मतदारसंघात नवखे आहेत.

सगेसोयरे आमने-सामने
उस्मानाबादेत सगेसोयऱ्यांतच लढत होत आहे. उद्धवसेनेचे ओमराजे निंबाळकर आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक रिंगणात उतरलेल्या अर्चना पाटील हे नातलग आहेत. अर्चना पाटील या आ. राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी असून, जगजितसिंह यांचे वडील डॉ. पद्मसिंह पाटील आणि ओमराजे यांचे वडील स्व. पवनराजे हे चुलतभाऊ होत. एका अर्थाने ही भाऊबंदकीची लढाई आहे.

हिंगोलीत दोन्ही भिडू पुन्हा लढू !
हिंगोलीच्या जागेवरून महायुतीत बरेच रणकंदन झाले. गेल्या दोन वर्षांपासून भाजपचे इच्छुक या मतदारसंघात काम करीत होते. मात्र, ऐनवेळी ही जागा शिंदेसेनेला सुटली. त्यामुळे भाजपमध्ये नाराजीनाट्य घडले. उमेदवार देतानादेखील अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली; मात्र त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ-वाशिममधून उमेदवारी देऊ, हेमंत पाटील यांच्याऐवजी बाबूराव कदम यांना उमेदवारी देण्यात आली. उद्धवसेनेने नागेश पाटील आष्टीकर या निष्ठावान शिवसैनिकाला संधी दिली. नागेश पाटील आणि बाबूराव कदम हे दोघेही विधानसभा निवडणुकीत हदगावमधून आमनेसामने होते. कदम यांनी बंडखोरी केली होती. मात्र, या दोघांच्या भांडणात माधवराव पाटील (काँग्रेस) निवडून आले. आता पुन्हा कदम-पाटील यांच्यात दुसरा सामना रंगतो आहे.

Web Title: Oh, the voice of which Shiv Sena? Who will won in Shiv Sena vs Shiv Sena battle?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.