महापालिकेत आम्हाला सोबत घेतल्याशिवाय कुणाचीही सत्ता येणार नाही: खा. सुनील तटकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 17:00 IST2026-01-09T16:55:58+5:302026-01-09T17:00:01+5:30
पाणी प्रश्नाला प्राधान्य, एक वर्षात सोडवणार; पक्षाची ताकद वाढतेय याचा आनंद

महापालिकेत आम्हाला सोबत घेतल्याशिवाय कुणाचीही सत्ता येणार नाही: खा. सुनील तटकरे
छत्रपती संभाजीनगर : हे शहर ऐतिहासिक आहे, महत्त्वाचे आहे. पण या शहराचा पाणीप्रश्न आजही सुटू शकला नाही, हे दुर्दैव होय. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) सत्तेवर आल्यास पाणी प्रश्नाला प्राधान्य देऊन एक वर्षात हा पाणी प्रश्न सोडवील, असे आश्वासन राष्ट्रवादी अजित पवारचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी गुरुवारी वंजारी मंगल कार्यालयात आयोजित मेळाव्यात दिले.
महापालिका निवडणुकीतील अजित पवार गटाच्या प्रचारार्थ आयोजित संवाद मेळाव्यात ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष आमदार सतीश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी सांगितले की, विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना छत्रपती संभाजीनगरात दरवर्षी मंत्रिमंडळ बैठका होत असत. त्यात शहराच्या आणि मराठवाड्याच्या प्रश्नांवर चर्चा होऊन निर्णय होत असे. त्यावेळी आम्हीही ठाम भूमिकेत होतो. आता ही प्रक्रिया खंडित झाली आहे.
छत्रपती संभाजीनगरात आमच्या पक्षाची ताकद वाढलेली आहे. आमच्या उमेदवाराच्या विजयाची धडकी घेऊन त्याचे कार्यालय जाळले जात आहे, हे याचे द्योतक आहे. धर्मनिरपेक्षता हा आमचा श्वास आहे. समाजातील सर्वच घटकांना सोबत घेण्याची पक्षाची स्पष्ट भूमिका आहे. तिकिटे देतानाही पक्षाने सर्व समाज घटकांचा विचार केला आहे. महापालिकेत आम्हाला सोबत घेतल्याशिवाय कुणाचीही सत्ता येणार नाही, असा विश्वास तटकरे यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी प्रदेश महिला अध्यक्षा रूपाली चाकणकर, प्रवक्ते सूरज चव्हाण, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष सुनील मगरे आदींची भाषणे झाली. शहराध्यक्ष अभिजित देशमुख यांनी प्रास्ताविक केले. नागेश भालेराव यांनी सूत्रसंचालन केले. कय्युम शेख यांनी आभार मानले. याचवेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महिला शहराध्यक्षा मेराज पटेल व आणखी काही कार्यकर्त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला.
आमची एनडीएची भूमिका कायम...
या मेळाव्यानंतर पत्रकारांंशी बोलताना खा. सुनील तटकरे म्हणाले, पुणे आणि पिंप्री चिंचवड महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत आहेत. यावरून विलिनीकरण वगैरे चर्चा सुरू असल्या तरी आम्ही एनडीएबरोबर कायम राहणार आहोत, ही आमची भूमिका स्पष्ट आहे. शरद पवारांना एनडीएत या असं सांगण्याइतका मी मोठा नाही.