भाजपच्या नगरसेवकांची ’डिनर डिप्लोमसी’; लॉबिंग करणाऱ्यांची प्रदेशाध्यक्षांकडून कानउघडणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 16:19 IST2026-02-05T16:15:27+5:302026-02-05T16:19:07+5:30

पक्षाच्या बाहेरील काही ठराविक स्वयंघोषित नेते भाजपचा महापौरपदासाठी उमेदवार कोण असावा, यासाठी भाजपच्या वरिष्ठांपर्यंत लाॅबिंग करीत आहेत.

Newly elected corporators' 'dinner diplomacy' with revenue minister; A wake-up call for lobbyists | भाजपच्या नगरसेवकांची ’डिनर डिप्लोमसी’; लॉबिंग करणाऱ्यांची प्रदेशाध्यक्षांकडून कानउघडणी

भाजपच्या नगरसेवकांची ’डिनर डिप्लोमसी’; लॉबिंग करणाऱ्यांची प्रदेशाध्यक्षांकडून कानउघडणी

छत्रपती संभाजीनगर : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत भाजपच्या ५७ नवनिर्वाचित नगरसेवकांची ‘डिनर डिप्लोमसी’ बुधवारी सायंकाळी पार पडली. नगरसेवकांच्या एकत्रिकरणासाठी शहराध्यक्ष किशोर शितोळे यांच्या घरी मेजवानीचा बेत आयोजित केला होता. महापौर, उपमहापौर निवडणूक होईपर्यंत कुणीही शहर सोडू नये, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.

बहुमतासाठी फक्त एक जागा कमी असल्यामुळे भाजपने नगरसेवकांना कुठेही बाहेर एकत्रित करून ठेवले नाही. नगरसेवकांमध्ये फूट पडेल, असे काहीही चित्र नव्हते. त्यामुळे नगरसेवकांच्या सहलीला पक्षाने फाटा दिला. येणाऱ्या पाच वर्षांत १५ महिन्यांसाठी एकेक महापौर, उपमहापौर असे आठ जण, स्थायी समिती सभापती पाच जण, सभागृह नेता पाच व एक गटनेता मिळून १९ नगरसेवकांना संधी देण्यावर भाजप कोअर कमिटी विचार करीत आहे. विषय व प्रभाग समितीसह स्थायी समिती सदस्य होण्याची सर्वांना दोन ते तीन वेळा संधी मिळू शकते.

लॉबिंग करणाऱ्यांची कानउघाडणी
महापौरपदासाठी लॉबिंग करणाऱ्यांची प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी कानउघाडणी केली. काही स्थानिक नेते बावनकुळे यांना वेगळी व प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांना वेगळी माहिती देतात. यावरूनही चव्हाण यांनी सगळ्यांचा खरपूस समाचार घेतला. पक्षाच्या बाहेरील काही ठराविक स्वयंघोषित नेते भाजपचा महापौरपदासाठी उमेदवार कोण असावा, यासाठी भाजपच्या वरिष्ठांपर्यंत लाॅबिंग करीत आहेत. बहुमतामुळे विनाखर्च पद मिळणार आहे, त्यामुळे खुल्या प्रवर्गातून निवडून आलेल्या सगळ्यांनाच महापौरपदाची लॉटरी लागावी, असे वाटणे साहजिक आहे. त्यामुळे सगळ्या इच्छुकांनी लाॅबिंग सुरू केले आहे.

महापौर, उपमहापौर भाजपचाच
महापौर, उपमहापौर भाजपचाच होणार आहे. दोन उपमहापौर करण्याचा कुठलाही मुद्दा नाही. सर्व नगरसेवकांच्या एकत्रिकरणासाठी महसूल मंत्र्यांच्या उपस्थितीत स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. गटनेतेपदी कोण असेल, याचा निर्णय गुरुवारी सकाळी जाहीर होईल.
- किशोर शितोळे, शहराध्यक्ष, भाजप

शिंदेसेनेत गटनेत्यावरून गटबाजी
शिंदेसेनेत ८ नगरसेवक एका गटात आणि ५ नगरसेवक दुसऱ्या गटात अशी परिस्थिती सध्या आहे. त्यामुळे गटनेता काेणत्या गटाचा होणार यावरूनच पक्षात गटबाजी सुरू झाल्याचे चित्र आहे. १३ नगरसेवकांचा गटनेता कोण हे मनपा निवडणुका होऊन २० दिवस झाले तरी ठरलेले नाही. पक्ष सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मतभेदामुळे हा निर्णय होत नाही. दोन गट पडले आहेत. त्यामुळे गटनेता कोणत्या गटाचा, अशी परिस्थिती सध्या आहे. शिंदेसेनेला मनपात भाजप काही पद देईल, अशी परिस्थिती सध्या तरी दिसत नाही.

Web Title : भाजपा पार्षदों की डिनर डिप्लोमेसी; लॉबिंग करने वालों को फटकार

Web Summary : भाजपा ने नव निर्वाचित पार्षदों के लिए रात्रिभोज का आयोजन किया, चुनाव तक एकता का निर्देश दिया। पदों के लिए लॉबिंग करने वाले नेताओं को फटकार लगाई गई। शिंदे सेना में गुटबाजी के कारण समूह नेता का चयन विलंबित। भाजपा का लक्ष्य अपना महापौर और उपमहापौर बनाना है।

Web Title : BJP Corporators' Dinner Diplomacy; Leaders Reprimanded for Lobbying

Web Summary : BJP hosted dinner for newly elected corporators, instructing unity until elections. Leaders lobbying for positions were reprimanded. Factionalism within Shinde Sena delays group leader selection. BJP aims for its own Mayor and Deputy Mayor.