राष्ट्रवादी (अजित पवार) छत्रपती संभाजीनगरात स्वबळावर; १०० जागा लढवण्याचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 14:30 IST2025-12-27T14:25:23+5:302025-12-27T14:30:02+5:30
भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार) महापालिका निवडणुकीत महायुतीच्या अनुषंगाने १८ डिसेंबरला पहिली आणि शेवटची बैठक झाली.

राष्ट्रवादी (अजित पवार) छत्रपती संभाजीनगरात स्वबळावर; १०० जागा लढवण्याचा निर्धार
छत्रपती संभाजीनगर: राष्ट्रवादीने (अजित पवार) बंडाचे निशाण फडकावित महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. घराणेशाहीच्या विरोधात आमच्या पक्षाचे १०० उमेदवार महापालिकेच्या निवडणुकीत स्वबळावर लढणार असल्याचे सांगून पक्षाचे शहराध्यक्ष अभिजित देशमुख यांनी शुक्रवारी 'लोकमत'शी बोलताना भाजपला घरचा अहेर दिला.
राष्ट्रवादीला (अजित पवार) युतीमध्ये घेण्याबाबत गेल्या आठवड्यात भाजप शहराध्यक्ष किशोर शितोळे व देशमुख यांच्या एकमेव बैठक झाली. त्यानंतर दोन्ही पक्षांकडून एकमेकांना कुठलाही संपर्क झालेला नाही. मुस्लीम मतदारबहुल भागात राष्ट्रवादीने उमेदवार द्यावेत, असा प्रस्ताव ठेवला होता. राष्ट्रवादीला त्यात काहीही तथ्य वाटले नाही. तेथेच महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय राष्ट्रवादीने नक्की केलेला होता.
भाजपकडे राष्ट्रवादीने मागितल्या होत्या ३५ जागा
भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार) महापालिका निवडणुकीत महायुतीच्या अनुषंगाने १८ डिसेंबरला पहिली आणि शेवटची बैठक झाली. राष्ट्रवादीने ३५ जागा वाटाघाटीतून 3 मिळाव्यात, असा प्रस्ताव भाजपसमोर ठेवला होता. यात मुस्लीमबहुल भागातील २५, इतर प्रभागातील १० जागांचा समावेश होता.
आमची तयारी पूर्ण
त्यांची युती कधी होते, यावर आमचे लक्ष आहे. युती झाली की, आम्ही १०० जागांवर उमेदवार देणार आहोत. आमची तयारी पूर्ण झालेली आहे. घराणेशाहीच्या विरोधात आमची लढाई असेल. महायुतीमध्ये आम्ही लढणार नाही.
- अभिजित देशमुख, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी (अजित पवार)