मनपा निवडणुकीत 'एआय' प्रचाराने रंगत; सोशल मीडियावर तापलेय ‘सुपर हिरों’चे रणांगण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 12:50 IST2026-01-10T12:47:17+5:302026-01-10T12:50:20+5:30
डिजिटल क्रिएटर्स एआयच्या मदतीने याबाबतचे व्हिडीओ तयार करत आहेत.

मनपा निवडणुकीत 'एआय' प्रचाराने रंगत; सोशल मीडियावर तापलेय ‘सुपर हिरों’चे रणांगण
- प्राची पाटील
छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिका निवडणुकीचा रंग चढत असताना राजकीय पक्षांसह सोशल मीडियाही तितकाच सक्रिय झालेला दिसतोय. या डिजिटल लढतीत आता मार्व्हलच्या जगातील टोनी स्टार्क, थानोस यांच्यासह सगळ्यांचे लाडके स्पायडरमॅन, हल्क, शक्तिमान हे सुपरहिरो उमेदवाराच्या रूपात दिसत आहेत. इन्स्टाग्रामवर फिरणाऱ्या अनेक व्हिडीओंमध्ये टोनी स्टार्क भाजपकडून आणि थानोस काँग्रेसकडून उभा असल्याचा विनोदी संदर्भ देत ‘मीम्स’ तयार केले जात आहेत.
जर टोनी स्टार्क खरोखर निवडणुकीत उतरला असता तर त्याचा प्रचार पूर्णपणे हाय-टेक राहिला असता. होलोग्राम सभा, एलईडी व्हॅन, डिजिटल जाहीरनामा आणि आयर्न मॅन सूटमधील एन्ट्री अशी त्याची स्टाइल सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. त्याच्या आश्वासनामध्ये एआय-कॅमेरे आणि स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल, ड्रोनमार्फत कचरा व्यवस्थापन, प्रत्येक चौकात फ्री वाय-फाय, पाणी शुद्धीकरणासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान, स्टार्टअप्ससाठी टेक्नॉलॉजी हब अशी भविष्यकालीन शहराची स्वप्ने तो दाखवतो. दुसरीकडे थानोसने भ्रष्टाचार, अतिक्रमण, ट्रॅफिक या समस्यांवर ‘एक स्नॅप आणि समस्या गायब’ अशी टॅगलाइन दिली आहे.
उपरोधिक टीका
हलकू भाऊला निवडणुकीत तिकीट मिळाले नाही यावर तो ‘आता मी फॉर्च्युनर कशी घेणार’ म्हणत ढसाढसा रडणाऱ्या पात्रातून उपरोधिकपणे भ्रष्टाचारावर टीका करण्यात आली. तर स्पायडरमॅन मीच शिवसेनेचा अधिकृत उमेदवार असल्याचे सांगत ‘याला घे त्याला फोड’ योजनेतून विकास करणार असल्याचे सांगतो. ‘नाद करू नका’, ‘विषय गंभीर तिथे आम्ही खंबीर’ अशाप्र कारची डायलॉगबाजी हे सुपरहिरो करताना दिसत आहेत. ज्यात हे पक्के राजकारणी झाल्याचे दिसतेय.
एआयचे व्हिडिओ
डिजिटल क्रिएटर्स एआयच्या मदतीने याबाबतचे व्हिडीओ तयार करत आहेत. असाच एक व्हिडीओ निवडणुकीवर आधारित तयार करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये सुपर हिरो राजकीय पक्षांकडे निवडणुकीचे तिकीट मागतो, पण कोणीच त्याला तिकीट देत नाही. त्यानंतर तो एका मोठ्या बिल्डरकडून पैसे उधार घेतो आणि त्या पैशांच्या बदल्यात त्याला तिकीट मिळते. ही संपूर्ण काल्पनिक कथा मजेशीर पद्धतीने सादर करण्यात आली आहे.