“स्वत:च्या भरवशावर बहुमत मिळवू; परंतु साथीदारांना सोडणार नाही”; CM फडणवीस यांचा टॉक शो
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 07:59 IST2026-01-09T07:58:08+5:302026-01-09T07:59:08+5:30
मनपा निवडणुकीत एक नंबरचा पक्ष भाजप असेल. एकट्या स्वत:च्या भरवशावर आम्ही बहुमत मिळवू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

“स्वत:च्या भरवशावर बहुमत मिळवू; परंतु साथीदारांना सोडणार नाही”; CM फडणवीस यांचा टॉक शो
लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर: महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान करताना नागरिकांनी कमळ निशाणीची काळजी घ्यावी. १६ जानेवारीपासून पुढील पाच वर्षे आम्ही तुमची काळजी घेऊ, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे ‘टॉक शो’मध्ये बोलताना दिला.
मनपा निवडणुकीत एक नंबरचा पक्ष भाजप असेल. एकट्या स्वत:च्या भरवशावर आम्ही बहुमत मिळवू. परंतु आम्ही मित्रांना, भगव्याच्या साथीदारांना सोडणार नाही, असेही त्यांनी सांगितले. चिकलठाणा एमआयडीसीतील प्रेसिडेंट लॉनमध्ये हा कार्यक्रम झाला. यावेळी ‘संकल्प विकसित, संरक्षित स्वच्छ व रोजगारक्षम छत्रपती संभाजीनगर’ या मथळ्याचा महापालिका निवडणुकीचा जाहीरनामा फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.
एमआयएमसोबत जाणार नाही....
अकोटमध्ये एमआयएमशी युती करणे आमच्या तत्त्वात नाही. तेथील आमदाराला पक्षातून निलंबित का करण्यात येऊ नये, अशी नोटीस दिली आहे. घरी बसू, परंतु एमआयएमसोबत जाणार नाही, असेही फडणवीस म्हणाले.
मुंबईला जन्माला येऊन म्हातारेदेखील झाले, विकास काय केला?
नागपूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईबाहेरील व्यक्ती असल्याचे म्हणत केलेल्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी प्रत्युत्तर दिले. मुंबईला जन्माला येऊन आता लोक म्हातारे होऊ लागले आहेत. मात्र, ते विकास करू शकले नाही. मुंबईच्या विकासाची खरी सुरुवात तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ५५ उड्डाणपूल बांधून केली होती आणि मी एकनाथ शिंदेंसोबत मिळून ३६० डिग्रीने विकास केला, असे फडणवीस म्हणाले.
नागपुरात आयोजित ‘तर्री पोहा विथ देवाभाऊ’ या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. अभिनेते भारत गणेशपुरे व अभिनेत्री-कवयित्री स्पृहा जोशी यांनी ही मुलाखत घेतली. सध्या राजकारण्यांमध्ये वेगळी भावना दिसून येते. आम्ही मतदारसंघाचे राजे असल्यासारखे ते वागतात. तेथील विकासकामे, इमारती आम्हाला विचारून झाले पाहिजे, असा त्यांचा आग्रह असतो. ही भावना संपली पाहिजे व सेवाभाव वाढायला हवा, असे मुख्यमंत्री म्हणाले.
माहेश्वरच्या धर्तीवर अहिल्यानगरचा विकास
अहिल्यानगर : शहराला केवळ अहिल्यानगर नाव देऊन आम्ही थांबणार नाहीत, तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी त्या काळात त्यांची राजधानी माहेश्वर सुसज्ज नगरी केली होती. त्याच पद्धतीने अहिल्यानगरचा विकास करण्यासाठी सर्व योजना राज्य सरकार इथे राबवू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे जाहीर सभेत दिली. जिल्ह्यात सिस्पे कंपनीच्या घोटाळ्याबाबत बोलताना त्यांनी देशाच्या गृहमंत्र्यांशी चर्चा करून पैसे लुटणाऱ्यांना जेलमध्ये पाठवू, अशी हमी दिली.