अलिगढ मुस्लीम विद्यापीठात ‘मराठी पाऊल पडते पुढे’; रोजगाराच्या संधीमुळे ४०० हून अधिक विद्यार्थ्यांचा प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 12:39 IST2025-07-25T12:39:14+5:302025-07-25T12:39:57+5:30

महाराष्ट्रात मराठी-हिंदीचा वाद पेटला असतानाच उत्तर भारतातील विद्यार्थी मराठी भाषेकडे आकृष्ट झाल्याचे आशादायी चित्र आहे.

'Marathi steps forward' at Aligarh Muslim University; More than 400 students admitted due to employment opportunities | अलिगढ मुस्लीम विद्यापीठात ‘मराठी पाऊल पडते पुढे’; रोजगाराच्या संधीमुळे ४०० हून अधिक विद्यार्थ्यांचा प्रवेश

अलिगढ मुस्लीम विद्यापीठात ‘मराठी पाऊल पडते पुढे’; रोजगाराच्या संधीमुळे ४०० हून अधिक विद्यार्थ्यांचा प्रवेश

प्राची पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रात मराठी-हिंदीचा वाद पेटला असतानाच उत्तर भारतातील विद्यार्थी मराठी भाषेकडे आकृष्ट झाल्याचे आशादायी चित्र आहे. अलिगढ मुस्लीम विद्यापीठात उत्तर भारतातील विद्यार्थी मराठी भाषा शिकत आहेत. महाराष्ट्रात रोजगाराचे प्रमाण जास्त आहे. या पार्श्वभूमीवर देशाची आर्थिक राजधानी आणि ‘स्वप्नांचे शहर’ मुंबईत जाऊन मोठा माणूस बनण्याचे स्वप्न बाळगणारे तरुण मराठी शिकत आहेत. एकीकडे हा वाद सुरू असताना हे चित्र सुखावह असल्याचे ‘एएमयू’च्या मराठी विभागाचे प्रभारी डॉ. ताहेर पठाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

एएमयूच्या आधुनिक भारतीय भाषा विभागात या वर्षी ४१० विद्यार्थी मराठी शिकत आहेत. ज्यात जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, पंजाब, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेशच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना भाषेवरून सुरू असलेल्या राजकारणाशी देणेघेणे नाही. त्यांच्यासाठी ‘रोजगार’ महत्त्वाचा आहे.

एएमयूमध्ये १९८८ मध्ये मराठी विभाग सुरू झाला. २०१५ ते २०२५ या १० वर्षांच्या काळात ४०० विद्यार्थ्यांपर्यंतचा आशादायी टप्पा पूर्ण झाला. अनेक विद्यार्थी पीएच.डी. करत आहेत.

ही आहेत कारणे

रोजगार, संशोधन, शिक्षण ही मराठी शिकण्यामागील कारणे आहेत. याशिवाय चित्रपटसृष्टीचे मुंबई, तर कलेचे पुणे माहेरघर आहे.

अभिनेते होण्याचे स्वप्न पाहणारे, अनुवाद, लेखन क्षेत्रात जाण्याची इच्छा असलेले विद्यार्थी मराठीला प्राधान्य देतात. हिंदी-मराठीतील संत, दलित साहित्यातील साधर्म्यामुळेही काही विद्यार्थी हे भाषेचे प्रेम म्हणून शिकतात.

एएमयूचे अभ्यासक्रम

एम.ए , बीए, डिप्लोमा, प्रमाणपत्र अभ्यासक्रम, अनुवाद डिप्लोमा, पीएच.डी.

भारतातील सर्वांत सोपी भाषा मराठी आहे. संस्कृत भाषेच्या हिंदी आणि मराठी या दोन जुळ्या मुली. हिंदी आणि मराठीत ५० टक्के सारखे शब्द आहेत. ज्या राज्यात आपण राहतो तिथली भाषा आपल्या यायलाच हवी. महाराष्ट्रात इंग्रजी शाळांचे अतिक्रमण होत आहे. त्याकडे लक्ष द्यायला हवे. मराठीचे जतन व्हायला हवे.

- डॉ. ताहेर एच. पठाण, प्रभारी, मराठी विभाग

Web Title: 'Marathi steps forward' at Aligarh Muslim University; More than 400 students admitted due to employment opportunities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.