रेकॉर्ड अजूनही कायम! औरंगाबादेत सर्वांत मोठा विजय माणिकराव पालोदकरांचा, मिळाली तब्बल...

By नजीर शेख | Published: April 27, 2024 04:53 PM2024-04-27T16:53:20+5:302024-04-27T16:57:03+5:30

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासात ७२.९४ टक्के मते घेऊन विजय मिळविण्याचा पालोदकरांचा रेकॉर्ड अजूनही कायम आहे.

Manikrao Palodkar's biggest victory in Aurangabad was 73 percent of the total votes | रेकॉर्ड अजूनही कायम! औरंगाबादेत सर्वांत मोठा विजय माणिकराव पालोदकरांचा, मिळाली तब्बल...

रेकॉर्ड अजूनही कायम! औरंगाबादेत सर्वांत मोठा विजय माणिकराव पालोदकरांचा, मिळाली तब्बल...

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीत एकूण मतदानात विजयी उमेदवाराने किती टक्के मते मिळविली याचा विचार केल्यास १९७१ मध्ये काँग्रेसचे माणिकराव पालोदकर यांनी ७२.९४ टक्के मते मिळवित प्रतिस्पर्ध्यावर प्रचंड मतांनी मात केली. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासात ७२.९४ टक्के मते घेऊन विजय मिळविण्याचा पालोदकरांचा रेकॉर्ड अजूनही कायम आहे.

लोकसंख्या वाढीनुसार औरंगाबाद मतदारसंख्या वाढत आहे. २०२४ च्या निवडणुकीत मतदारसंख्या २० लाखांच्या वर गेली आहे. १९७१ मध्ये मात्र औरंगाबाद मतदारसंघात मतदारसंख्या ही केवळ ५ लाख ३० हजार ९२६ इतकी होती. निवडणुकीत २ लाख ६७ हजार २४० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. हे मतदान ५२.६२ टक्के झाले. माणिकराव पालोदकर यांनी १ लाख ९४ हजार ९२६ मते मिळविली. तर, त्यांचे प्रतिस्पर्धी रामभाऊ गावंडे यांना ४७ हजार १५ मते मिळाली.

पालोदकर यांच्या मोठ्या मताधिक्याच्या विजयाखालोखाल औरंगाबादचे दोन वेळा खासदार राहिलेले भाऊराव देशमुख यांनीही मोठ्या फरकाने विजय मिळविला. १९६२ साली झालेल्या निवडणुकीत ४ लाख ५५ हजार ३४ मतदार होते. निवडणुकीत २ लाख २९ हजार ६६० इतके मतदान झाले. भाऊराव देशमुख यांना १ लाख ४२ हजार मते मिळाली. तर, त्यांचे प्रतिस्पर्धी बी.एस. मोरे यांना ७३ हजार ८५९ मते मिळाली. देशमुख यांना झालेल्या मतदानाच्या ६५.८२ टक्के मते मिळाली. बापू काळदाते यांनीही १९७७ मध्ये ५६.४७ टक्के मते घेतली होती. स्वामी रामानंदतीर्थ, काझी सलीम, रामकृष्णबाबा पाटील, चंद्रकांत खैरे यांनीही ५० टक्क्यांपेक्षा अधिक मते घेऊन विजय मिळविला आहे.

वर्ष - एकूण मतदान - विजयी उमेदवार - मिळालेली मते(टक्के)
१९६२ - २२९६६०- भाऊराव देशमुख - ६५.८२
१९७१ - २६७२४० - माणिकराव पालोदकर - ७२.९४
१९७७ - ३५६००३ - बापूसाहेब काळदाते- ५६.४७

Web Title: Manikrao Palodkar's biggest victory in Aurangabad was 73 percent of the total votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.