लिंबाच्या झाडाखाली थांबलेल्या दोन मित्रांवर वीज कोसळली, दोघांचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 18:48 IST2022-06-12T18:48:06+5:302022-06-12T18:48:14+5:30
फुलंब्री तालुक्यातील पिंप्री सताळा येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. दोन पक्क्या मित्र्यांचा असा अंत झाल्याने गावावर पसरली शोककळा पसरली.

लिंबाच्या झाडाखाली थांबलेल्या दोन मित्रांवर वीज कोसळली, दोघांचा जागीच मृत्यू
फुलंब्री: तालुक्यातील पिंप्री सताळा परिसरात पावसापासून बचाव करण्यासाठी झाडाखाली थांबलेल्या दोन तरुणावर वीज कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत दोघांचा जागीच मृतू झाला. घटना आज म्हणजेच रविवारी दुपारी एक वाजेच्या दरम्यान घडली आहे. विशेष म्हणजे, मृत्यू झालेले दोन्ही तरुण एकमेकांचे पक्के मित्र होते. त्यांच्या अशा अचानक जाण्याने गावावर शोककळा पसरली आहे.
सविस्तर माहिती अशी की, पिंप्री सताळा येथील रोहनसिंग विजयसिंग शिंदे(वय १५ ) व रवी जनार्दन कळसकर(वय २१) हे दोघे राविवारी सकाळी १० वाजेच्या दरम्यान गट १५१ मधील त्यांच्या शेतात कामासाठी गेले होते. काम सुरू असताना दुपारी एक वाजेच्या सुमारास अचानक पावूस पडण्यास सुरुवात झाली. पावसापासून बचाव करण्यासाठी दोघे जवळच असलेल्या लिंबाच्या झाडाखाली गेले. यावेळी अचानक त्या झाडावर वीज कोसळली, यात दोघाचा जागीच मृतू झाला. त्यांचे शव फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहेत.
दोघे पक्के मित्र
या घटनेतील मयत विजयसिंग शिंदे व रवी कळसकर हे दोघे पक्के मित्र होते. दिवस उगवला की दोघेही सोबतच राहत असे. रविवारचा दिवस त्यांच्यासाठी वाईट ठरला. दोन्ही मित्र सोबतच जग सोडून गेल्याने गावात हळ हळ व्यक्त होत आहे. या घटनेतील रोहनसिंग शिंदे हा आळंद येथील शाळेत शिक्षण घेत होता, तो यंदा दहावीला गेला होता तर रवी कळसकर हा सद्य शिक्षण घेत नव्हता. रवी कळसकर हा आई -वडिलांना तीन बहिणीच्या पाठीवर एकटाच होता तर रोहनसिंग शिंदे याला एक बहिण व एक भाऊ आहेत.