विकासकरून बदल घडवून आणायचाय, मग ‘वंचित’ला एक संधी द्या: सुजात आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 16:12 IST2026-01-09T16:11:40+5:302026-01-09T16:12:33+5:30
छत्रपती संभाजीनगर मनपा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीचा ‘बहुजनांचा जाहीरनामा’ प्रसिद्ध

विकासकरून बदल घडवून आणायचाय, मग ‘वंचित’ला एक संधी द्या: सुजात आंबेडकर
छत्रपती संभाजीनगर : शहराला अखंडित पाणीपुरवाठा हवाय, ठप्प झालेली विकासाची गाडी रुळावर आणायचीय, आपणास बदल हवाय, मग ‘वंचित बहुजन आघाडी’ला एक संधी देऊन बघा, असे आवाहन करीत युवा नेते सुजात आंबेडकर यांनी गुरुवारी पदयात्रांद्वारे विविध प्रभाग ढवळून काढले.
वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सुजात आंबेडकर यांनी शहरातील विविध प्रभागांत पदयात्रा काढल्या. यामध्ये प्रथम प्रभाग क्रमांक १ मधील एकतानगर, हर्सूल, त्यानंतर प्रभाग क्र. ७ मधील सिद्धार्थनगर, प्रभाग क्रमांक ८ मध्ये आंबेडकरनगर, प्रभाग क्रमांक २० आणि २१ मधील इंदिरानगर, काबरानगर, प्रभाग क्रमांक २३ मधील विश्रांतीनगर आणि प्रभाग क्रमांक २४ मधील चिकलठाणा या भागांत पदयात्रांना जोरदार प्रतिसाद मिळाला. त्यांनी दिवसभरात ६ प्रभागांत पदयात्रा काढल्यानंतर सायंकाळी ४ प्रभागांत जाहीर सभा घेतल्या.
आतापर्यंतच्या सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे पाण्याचा प्रश्न जटिल झाला आहे. सध्या आठ ते दहा दिवसांतून एकदा नागरिकांना पाणी मिळते, कचऱ्याचा प्रश्न भेडसावत आहे. शिक्षण, आरोग्य, वाहतुकीचा प्रश्न सतावत आहे. या शहरात विकासाची कामे ठप्प झालेली आहेत. आपणास विकास हवा आहे, तर मग वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना भरभरून मतदान करा, असे आवाहन त्यांनी त्यांनी मतदारांना केले.
पदयात्रेत संबंधित प्रभागातील उमेदवार, स्थानिक पदाधिकाऱ्यांसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सुजात आंबेडकर यांंना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
बहुजनांचा जाहीरनामा
जिल्हा प्रभारी अरुंधती शिरसाट तसेच पूर्व जिल्हा अध्यक्ष रामेश्वर तायडे, पश्चिम जिल्हा अध्यक्ष रूपचंद गाडेकर यांनी सायंकाळी छत्रपती संभाजीनगर मनपा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीचा ‘बहुजनांचा जाहीरनामा’ प्रसिद्ध केला. यामध्ये प्रत्येक प्रभागात ‘सीबीएसई’च्या माध्यमातून जागतिक दर्जाचे शिक्षण, महात्मा फुले मोहल्ला क्लिनिक, २४ तास पाणीपुरवठा, महिला व शालेय विद्यार्थ्यांना स्मार्ट सिटी बसचा मोफत प्रवास, शून्य कचरा, कर सवलत व झोपडपट्टी निर्मूलन आदींचा समावेश आहे.