उमेदवारांनी तक्रार मागे घेतली नाही तर ईव्हीएम पडताळणी होणार; कशी आहे पद्धत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 13:54 IST2025-01-16T13:54:06+5:302025-01-16T13:54:53+5:30

आयोगाने एका ईव्हीएम मशीनच्या पडताळणीसाठी ४७ हजार २०० रुपये इतके शुल्क निश्चित केलेले आहे.

If the candidates do not withdraw their complaints, EVM verification will be done; What is the procedure? | उमेदवारांनी तक्रार मागे घेतली नाही तर ईव्हीएम पडताळणी होणार; कशी आहे पद्धत?

उमेदवारांनी तक्रार मागे घेतली नाही तर ईव्हीएम पडताळणी होणार; कशी आहे पद्धत?

छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीनंतर पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम मशीनच्या पडताळणीसाठी अर्ज दाखल केले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ईव्हीएम पडताळणी होणार असून यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पुणे येथील यशदामध्ये प्रशिक्षण देण्यात आले. ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी तक्रार माघार घेतली नाही तर पडताळणी होणार आहे, असे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात औरंगाबाद मध्य मतदारसंघातून ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार बाळासाहेब थोरात, एमआयएमचे उमेदवार नासेर सिद्दीकी यांनी, औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार राजू शिंदे आणि वैजापूर मतदारसंघातून ठाकरे गटाचे दिनेश परदेशी यांनी ईव्हीएम मशीनच्या पडताळणीसाठी अर्ज केले आहेत. त्यासाठी प्रशासनाकडे आवश्यक शुल्काचा भरणाही केला. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून ईव्हीएम पडताळणीची तारीख जाहीर झाल्यानंतर पडताळणी होईल. 

मशीनची कार्यक्षमता तपासणार
आयोगाने एका ईव्हीएम मशीनच्या पडताळणीसाठी ४७ हजार २०० रुपये इतके शुल्क निश्चित केलेले आहे. उमेदवारांनी मागणी केलेल्या बूथवर निवडणुकीत पडलेल्या मतांची पडताळणी होणार नाही. तर केवळ ईव्हीएम मशीनची कार्यक्षमता तपासली जाईल. उमेदवारांनी नमूद केलेल्या केंद्रावरील ईव्हीएममधील आधीचा डेटा डिलीट केला जाईल. त्यावर नव्याने मॉक पोल (रंगीत तालीम) घेण्यात येईल. या रंगीत तालमीत नोंदविलेली मते बरोबर पडली की नाही, एवढेच तपासले जाईल.

Web Title: If the candidates do not withdraw their complaints, EVM verification will be done; What is the procedure?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.