आधी कर्तव्य बजावले, आज जोशात विसर्जन केले; टाळमृदंगाच्या तालावर थिरकले पोलीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2022 19:04 IST2022-09-10T19:04:05+5:302022-09-10T19:04:24+5:30
पोलीसांच्या गणपतीचे आज उत्साहात झाले विसर्जन; बंदोबस्तामुळे अनंत चतुर्दशीला करता आले नाही विसर्जन

आधी कर्तव्य बजावले, आज जोशात विसर्जन केले; टाळमृदंगाच्या तालावर थिरकले पोलीस
खुलताबाद (औरंगाबाद) : पोलीस म्हटले की, त्यांना सणवाराला सुट्टी नसते उलटे चोख कर्तव्य बजावावे लागते. त्यांच्यामुळे सर्वसामन्य सुखाने सणवार साजरे करतात. या गणेश विसर्जनासही असेच झाले. काल विसर्जन सोहळ्यामुळे शहरात कडेकोट बंदोबस्त होता. त्यामुळे पोलिसांच्या गणपतीचे विसर्जन आज झाले. खुलताबाद ठाण्याच्या आवारात बसविलेल्या गणपती बाप्पाचे आज मोठ्या उत्साहात, टाळ टाळमृदंगाच्या तालावर थिरकत पोलिसांनी विसर्जन केले.
पोलिसांनी पारंपारिक वाद्याच्या तालावर मनसोक्त नाचत बाप्पाला निरोप दिला. नेहमी खाकी वर्दीत असनारे पोलीस आज साध्यावेशात टाळमृदंगाच्या तालावर पावली खेळत गणपती बाप्पा मोरया म्हणत होते. केवळ टाळमृदंगाचा गजर, त्यावर थिरकत मिरवणूक निघाली. कुठेही आरडाओरड नाही. शांततेत सार्वजनिक विसर्जन विहिरीत बाप्पाचे विसर्जन केले. या विसर्जन मिरवणुकीत खुलताबाद भद्रा मारूती संस्थानचे भजनी मंडळ व पदाधिकारी सहभागी झाले होते.
यात पोलीस निरीक्षक भुजंग हातमोडे, उपनिरिक्षक विजयकुमार वाघ, जनार्दन मुरमे, संजय बहुरे, शेख जाकीर, नवनाथ कोल्हे, रतन वारे, सुहास डबीर, के. के. गवळी, विनोद बिघोत, मनोज घोडके, उत्तम खटके यांच्यासह कर्मचारी विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते.