अखेर ठरलं... छत्रपती संभाजीनगरच्या महापौर, उपमहापौर निवडणूक १० फेब्रुवारीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 16:23 IST2026-01-29T16:22:46+5:302026-01-29T16:23:05+5:30
पिठासन अधिकारी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची नेमणूक

अखेर ठरलं... छत्रपती संभाजीनगरच्या महापौर, उपमहापौर निवडणूक १० फेब्रुवारीला
छत्रपती संभाजीनगर : शहराच्या २३ व्या महापौर, उपमहापौर पदांची निवडणूक मंगळवार, १० फेब्रुवारी रोजी होईल. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी निवडणुकीसंदर्भातील आदेश बुधवारी सकाळी काढले. या निवडणुकीसाठी महापालिकेत सर्व ११५ नगरसेवकांची विशेष सभा आयोजित करण्यात येईल. यावेळी पिठासन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे काम पाहतील, असे विभागीय आयुक्तांच्या आदेशात म्हटले आहे.
महापालिकेची निवडणूक १५ जानेवारी रोजी घेण्यात आली. १६ रोजी निकाल जाहीर झाले. त्यानंतर लगेचच महापालिकेने महापौर निवडणुकीसाठी विभागीय आयुक्तांकडे पत्र पाठवले होते. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमुळे महापौर पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम लांबत गेला. बुधवारी विभागीय आयुक्तांनी निवडणुकीची तारीख, पिठासन अधिकाऱ्यांची नेमणूक केली. गुरुवार, २९ जानेवारी रोजी महापालिका सचिव विभाग निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करणार आहे. उमेदवारी अर्ज वाटप, अर्ज भरण्याची शेवटची तारीख निश्चित केली जाईल. महापालिकेत भाजपचे ५७ नगरसेवक निवडून आले आहेत. बहुमतासाठी भाजपला एका मताची गरज आहे. एमआयएमचे ३३, शिंदेसेनेचे १३, उद्धवसेनेचे सहा, वंचित बहुजन आघाडीचे चार तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार)चे प्रत्येकी एक नगरसेवक निवडून आले आहेत.
भाजपमध्ये जोरदार स्पर्धा
महापौर पदासाठी भाजपमध्ये जोरदार स्पर्धा सुरू असून, दोन ते तीनवेळा निवडून आलेले नगरसेवक स्पर्धेत आहेत. इच्छुक उमेदवारांनी स्थानिक आणि वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. उपमहापौरपद शिंदेसेनेला मिळेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी अद्याप गटनेता निश्चित केलेला नाही. विभागीय आयुक्तांकडे गटाची नोंदणीसुद्धा करण्यात आलेली नाही. एमआयएम पक्षाला गटनेता आणि विरोधी पक्षनेता निवडावा लागणार आहे.
निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज
महापौर, उपमहापौर निवडणुकीसाठी महापालिका प्रशासन सज्ज असून, सर्व पदाधिकाऱ्यांची दालने, त्यांना लागणारे कर्मचारी, महापौर बंगला, सर्वसाधारण सभेचे सभागृह नूतनीकरणासह सज्ज आहे.