लोकसभेसाठी आजपासून दाखल करा उमेदवारी; जिल्हाधिकारी कार्यालयाकडील वाहतुकीत बदल 

By विकास राऊत | Published: April 18, 2024 12:10 PM2024-04-18T12:10:52+5:302024-04-18T12:11:42+5:30

निवडणूक प्रक्रियेला सुरुवात :१८ ते २९ एप्रिलपर्यंत वाहतुकीची कोंडी होऊन नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील वाहतूक वळविण्यात आली आहे.

File nomination for Lok Sabha from today; Change in traffic from the Collectorate | लोकसभेसाठी आजपासून दाखल करा उमेदवारी; जिल्हाधिकारी कार्यालयाकडील वाहतुकीत बदल 

लोकसभेसाठी आजपासून दाखल करा उमेदवारी; जिल्हाधिकारी कार्यालयाकडील वाहतुकीत बदल 

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात उमेदवारी दाखल करण्यासाठी गुरूवार, १८ एप्रिलपासून सुरुवात होत आहे. प्रशासनाच्या पूर्वतयारीचा अंतिम आढावा बुधवारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतला. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या १०० मीटर परिसरातील सुरक्षा नियमांच्या अनुषंगाने वाहतूक मार्गात बदल केले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या येण्या-जाण्याबाबतचे मार्ग, वाहन पार्किंग, उमेदवारी अर्ज दाखल करावयास येणाऱ्या उमेदवारांसाठी असणारे नियम व सुरक्षा यंत्रणेचा, कार्यालयात येणाऱ्यांना बसण्यासाठी जागा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आवश्यकतेनुसार दिशादर्शक फलक तयारीचा आढावा घेण्यात आला. उमेदवारी अर्ज दाखल करणे, अर्जांची छाननी, उमेदवारी अर्ज माघारी घेणे, या सगळ्या प्रक्रियेसाठी पोलिस बंदोबस्त व आयोगाच्या सुरक्षा निर्देशांची तपासणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली. बैठकीला उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत स्वामी आदी उपस्थित हाेते.

मतदारसंघाचे नाव : औरंगाबाद
मतदारसंघ क्रमांक : १९
उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख १८ ते २५ एप्रिल
वेळ : सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत
स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय
उमेदवारी अर्ज किंमत : १०० रुपये.
अनामत रक्कम : खुला प्रवर्ग २५ हजार, राखीव प्रवर्ग १२ हजार ५००
उमेदवारी अर्ज छाननी : २६ एप्रिल सकाळी ११ वाजता
अर्ज मागे घेण्याची मुदत : २९ एप्रिल दुपारी ३ वाजेपर्यंत
निवडणुकीसाठी मतदान : १३ मे रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत

१८ ते २९ पर्यंत वाहतुकीत बदल....
१८ ते २९ एप्रिलपर्यंत वाहतुकीची कोंडी होऊन नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील वाहतूक वळविण्यात आली आहे. १८ ते २९ दरम्यान दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ६ दरम्यान या परिसरातील वाहतूक सर्व वाहनांसाठी बंद करुन अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

वाहतुकीस बंद असलेले मार्ग.....
चांदणे चौक- जिल्हाधिकारी कार्यालय ते विभागीय आयुक्त यांच्या निवासस्थानाजवळील टी-पॉइंटपर्यंतचा मार्ग वाहतुकीस बंद असेल.

पर्यायी मार्ग असे असतील....
चांदणे चौक ते अण्णाभाऊ साठे चौक मार्गे उद्धवराव पाटील चौक ते सत्यविष्णू हॉस्पिटल चौक- एन १२ गणपती विसर्जन विहीर मार्गे वाहने येतील व जातील.
चांदणे चौक ते फाजलपुरा ते चेलीपुरा चौक ते चंपा चौक मार्गे विभागीय आयुक्त निवासस्थानासमोरील दर्गाह मार्गे येतील व जातील. पोलिस, रुग्णवाहिका, अग्निशमन दल, अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना हा वाहतूक बदल लागू असणार नाही, असे शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अमोल देवकर यांनी कळविले आहे.

सामान्यांना प्रवेश नाही....
जिल्हाधिकारी कार्यालयात सामान्यांना १८ ते २९ एप्रिलपर्यंत बंदोबस्तामुळे प्रवेश नसेल. प्रशासकीय कामासाठी अर्ज, निवेदन, तक्रारींसाठी नागरिकांना अप्पर तहसील कार्यालयात देवीदास झिटे, अव्वल कारकून यांना भेटता येईल.
कार्यालयातील अ, ब, क श्रेणीतील कर्मचाऱ्यांना या काळात सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ व ड श्रेणीतील कर्मचाऱ्यांना सकाळी ९.३० ते ६.३० यावेळेत यावेत लागेल. असे परिपत्रक निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांनी जारी केले आहे.

Web Title: File nomination for Lok Sabha from today; Change in traffic from the Collectorate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.