सखी मतदान केंद्रांवर दिसला आगळा उत्साह; आगळावेगळ्या प्रयोगाचे होत आहे कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 15:25 IST2019-04-24T15:25:03+5:302019-04-24T15:25:03+5:30
महिलांच्या मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाचा उपक्रम

सखी मतदान केंद्रांवर दिसला आगळा उत्साह; आगळावेगळ्या प्रयोगाचे होत आहे कौतुक
- रुचिका पालोदकर
औरंगाबाद : महिलांची मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून महिला मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी यावर्षी प्रथमच सखी मतदान केंद्र सुरू करण्यात आले होते. महिला व्यवस्थापित मतदान केंद्र म्हणून ओळखल्या गेलेल्या या सखी मतदान केंद्रांवरचे वातावरण दिवसभर उत्साहपूर्ण आणि नावीन्याने भरलेले दिसून आले.
औरंगाबाद मतदारसंघात एकूण १२ सखी मतदान केंद्रे होती. यापैकी ४ केंद्रे शहरात, तर उर्वरित तालुक्याच्या ठिकाणी होती. आयशा मोतीवाला इंग्रजी पूर्व प्राथमिक शाळा, टाइम्स कॉलनी, आझाद मुलींचे महाविद्यालय नवखंडा ज्युबिलीपार्क, चाटे स्कूल सातारा परिसर, महाराष्ट्र पब्लिक स्कूल ही शहरातील चार केंद्रे सखी मतदान केंद्रे होती.
गुलाबी कमान लावून ही मतदान केंद्रे सजविण्यात आली होती. या कमानीवर लावण्यात आलेली ‘मी मतदान करणारच’ अशी घोषवाक्ये महिला मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करीत होती. सखी मतदान केंद्रावर अधिकारी, कर्मचारी, सहायक सर्वच महिला होत्या. सखी केंद्रांवर महिला पोलिसांचीच नियुक्ती करण्यात यावी, असे अपेक्षित होते. मात्र, औरंगाबाद शहरात सुरक्षेच्या कारणास्तव संवेदनशील ठिकाणांवरच्या सखी मतदान केंद्रावर महिला पोलिसांऐवजी पुरुष पोलीस पहारा देत असल्याचे दिसून आले.
उत्तम व्यवस्था
संपूर्णपणे ‘महिला राज’ असणाऱ्या सखी मतदान केंद्रावरील सर्व व्यवस्था अत्यंत चोख असून, सर्व काही शिस्तीत होत आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत हा प्रयोग पहिल्यांदाच केल्यामुळे याबाबत कुतूहल होतेच आणि महिला एखादे मतदान केंद्र कसे चालवितात याची उत्सुकताही होती. आतील सर्व कारभार पाहून या महिलांचे कौतुक वाटत आहे, अशी प्रतिक्रिया सखी मतदान केंद्रांवर मतदान करण्यासाठी आलेल्या अनेक महिला मतदारांनी दिली.
महिला सशक्तीकरणाचा प्रयत्न
सखी मतदान केंद्राचे काम खूप चांगले वाटले. छान अनुभव होता. सगळी व्यवस्था उत्तम आहे. महिला अधिकाऱ्यांचे उत्तम सहकार्य मिळाले. आलेल्या लोकांना महिला कर्मचारी ज्या पद्धतीने सहकार्य करतात ते खूपच उल्लेखनीय आहे. महिला सशक्तीकरणाच्या दिशेने पडलेले हे आणखी एक पाऊल आहे, असे वाटते.
-सरोज बलदवा
महिलांची जागरूकता वाढेल
यावर्षी पहिल्यांदाच सुरू करण्यात आलेले सखी मतदान केंद्र ही अतिशय चांगली संकल्पना आहे. निश्चितच यातून महिलांना मतदान करण्याची प्रेरणा मिळेल. औरंगाबाद हे माझे माहेर असून, मी येथे खास मतदानासाठी आले आहे. या प्रयोगामुळे मतदानाच्या बाबतीत महिला अधिकाधिक जागरूक होतील, असे वाटते. मतदानावेळी दिसून येणारे गंभीर वातावरण येथे नसून, सखी मतदान केंद्रावर अत्यंत उत्साह दिसून येत आहे.
-डॉ. माधुरी मोहिते