निवडणूक कामामुळे ‘एसटी’च्या १३ हजार किलोमीटरच्या फेऱ्या रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 19:19 IST2019-04-24T19:18:07+5:302019-04-24T19:19:29+5:30
दोन दिवसांत सुमारे १३ हजार कि.मी.च्या फेऱ्या रद्द

निवडणूक कामामुळे ‘एसटी’च्या १३ हजार किलोमीटरच्या फेऱ्या रद्द
औरंगाबाद : मतदान केंद्रांवर कर्मचारी आणि साहित्याची ने-आण करण्यासाठी २२ आणि २३ एप्रिल रोजी २२३ बसगाड्या पाठविण्यात आल्या. यामुळे मध्यवर्ती बसस्थानकाच्या दोन दिवसांत सुमारे १३ हजार कि.मी.च्या फेऱ्या रद्द झाल्या. जिल्ह्यातील इतर आगारांतील रद्द झालेल्या फेऱ्यांचा बुधवारी आढावा घेण्यात येणार आहे.
औरंगाबाद लोकसभा निवडणुकीसाठी औरंगाबाद विभागातील म्हणजे जिल्ह्यातील विविध आगारांतून या बसेस पुरविण्यात आल्या. औरंगाबाद जिल्ह्यात एकूण बसेसची संख्या ५५० वर आहे. त्यातील २२३ बसेस दोन दिवस निवडणुकीच्या कामात व्यस्त राहिल्या. त्यामुळे दोन दिवस कमी गर्दीच्या मार्गावरील बसेस रद्द करण्यात आल्या. मतदानामुळे मंगळवारी प्रवाशांची फारशी गर्दी नव्हती; परंतु नोकरी, व्यवसायानिमित्त पुण्याला गेलेले नागरिक मतदानासाठी शहरात दाखल झाले होते. मतदानानंतर परतीच्या प्रवासामुळे पुणे मार्गावरील बसेसना प्रवाशांची गर्दी होती.
७० फेऱ्या रद्द
मध्यवर्ती बसस्थानक ाचे आगार व्यवस्थापक (वरिष्ठ) एस.ए. शिंदे म्हणाले की, सोमवारी सुमारे ६ हजार कि.मी. अंतरच्या फेऱ्या रद्द झाल्या, तर मंगळवारी ७० फेऱ्या रद्द झाल्या. त्यातून सुमारे ७ हजार कि.मी. अंतर रद्द झाले. मतदानामुळे अनेक मार्गांवर प्रवाशांची फारशी गर्दी नव्हती; परंतु पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी केली होती.