प्रशासनाचा मोठा निर्णय; महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सलग तीन दिवस 'ड्राय डे'!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 19:54 IST2026-01-12T19:49:58+5:302026-01-12T19:54:15+5:30
तस्करी रोखण्यासाठी विशेष पथके तैनात, लक्ष ठेवण्यासाठी नऊ अधिकारी, २५ अंमलदारांचे तीन पथक गस्तीवर राहणार

प्रशासनाचा मोठा निर्णय; महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सलग तीन दिवस 'ड्राय डे'!
छत्रपती संभाजीनगर: महानगरपालिका निवडणुकीच्या धामधुमीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने शहरात सलग तीन दिवस 'ड्राय डे' घोषित केला आहे. १४, १५ आणि १६ जानेवारी या कालावधीत महानगरपालिका हद्दीतील सर्व वाईन शॉप, बिअर बार आणि देशी दारूची दुकाने पूर्णपणे बंद राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत.
सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त
१५ जानेवारी रोजी होणारे मतदान आणि १६ जानेवारीचा निकाल, या दोन संवेदनशील दिवसांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. दंगा काबू पथक आणि एसआरपीएफच्या तुकड्यांनाही पाचारण करण्यात आले आहे. १३ जानेवारी रोजी प्रचार थंडावणार असून त्यानंतरच्या काळात होणारे 'लक्ष्मीदर्शन' आणि मद्याचे वाटप रोखणे, हे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे.
तस्करांवर उत्पादन शुल्क विभागाचा 'वॉच'
शहरात बंदी असली तरी ग्रामीण भागातील दुकानांमधून मद्याची तस्करी होण्याची दाट शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अभिनव बालुरे यांनी तीन विशेष भरारी पथके तैनात केली आहेत. यामध्ये पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि अंमलदारांचा समावेश असून, शहरातील ढाबे आणि हॉटेल्सवरही त्यांची नजर असणार आहे. "नुकतीच गोव्यातील अवैध दारू जप्त करण्यात आली असून, अशा प्रकारे अवैध विक्री करणाऱ्यांवर कठोर गुन्हे दाखल केले जातील," असा इशारा बालुरे यांनी दिला आहे.