महायुतीच्या विरोधात बोलू नका; पालकमंत्र्यांना समज, उपमुख्यमंत्र्यांना विनंती: चंद्रशेखर बावनकुळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 16:44 IST2026-01-06T16:43:36+5:302026-01-06T16:44:04+5:30
राज्यातील मंत्री, पालकमंत्र्यांनी, खासदार, आमदारांनीदेखील याचे तारतम्य बाळगणे गरजेचे आहे.

महायुतीच्या विरोधात बोलू नका; पालकमंत्र्यांना समज, उपमुख्यमंत्र्यांना विनंती: चंद्रशेखर बावनकुळे
छत्रपती संभाजीनगर : महायुतीतील पक्ष ज्या महापालिकेत स्वतंत्रपणे लढत असतील, तेथे नेत्यांनी महायुतीला फटका बसेल, असे विधान करू नये, असे युतीतील सर्व पक्षांच्या समन्वय बैठकीत ठरले आहे. विकासाच्या मुद्यांविना काहीही बोलायचे नाही, हीच अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्याकडून आहे. राज्यातील मंत्री, पालकमंत्र्यांनी, खासदार, आमदारांनीदेखील याचे तारतम्य बाळगणे गरजेचे आहे. सर्व पालकमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना याबाबत समज दिली आहे, तर पवारांना विनंती आहे की, त्यांनीदेखील युती धर्म पाळावा, असे मत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
मनपा निवडणुकीत कुणाचे आव्हान आहे, यावर बोलताना मंत्री बावनकुळे म्हणाले, काही ठिकाणी भाजप व शिंदेसेना, एमआयएम, राष्ट्रवादी, उद्धवसेना विरोधात आहे. २२ बंडखोर असले तरी ते आमचेच आहेत. मात्र, जनता भाजपसोबतच राहणार आहे.
उपमुख्यमंत्री पवार यांनी केलेल्या टिकेनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला महायुतीत घ्यायला नको होतं, असे विधान केले. मग पवारांना महायुतीत घेताना भाजपने अभ्यास केला नाही काय? या प्रश्नावर बावनकुळे म्हणाले की, उपमुख्यमंत्री पवार यांनी तसे बोलायला नको होते. महायुतीच्या समन्वय बैठकीत ठरले आहे की, जेथे महायुतीतील पक्ष स्वतंत्रपणे लढत असेल तेथे नेत्यांनी महायुतीला फटका बसेल, असे विधान करू नये. दादांना विनंती आहे की, मनभेद होणार नाही याची दक्षता घ्यावी. त्यांना समज देण्याची माझी उंची नाही. परंतु समन्वयक म्हणून विनंती आहे. महायुतीतील १३ पक्षांबाबत काहीही बोलू नये.
‘जो जीता वही सिकंदर’ हे महत्त्वाचे.....
किचनमध्ये सर्व्हे केला, निष्ठावंतांना डावलले, यावरून भाजप कार्यालयात दोन दिवस राडा झाला. यावर बावनकुळे म्हणाले, सर्व्हे काही अंतिम नसतो. सर्वंकष विचार केला जातो. उमेदवाराच्या सामाजिक, राजकीय परिस्थितीचा विचार केला. शेवटी ‘जो जीता वही सिंकदर’ या भूूमिकेतून उमेदवारी दिली जाते. एखाद्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतो. काही जणांनी उमेदवारी मागे घेतली. आम्ही त्यांच्यासोबत राहू. जे विरोधात गेले, तेदेखील आमचेच आहेत.
बिनविरोध निवड म्हणजे प्रगल्भ लोकशाही...
बिनविरोध निवडणुका होणे हे प्रगल्भ लोकशाहीचे लक्षण आहे. स्थानिक जनता, पक्ष ज्याच्यासोबत आहे. त्यानुसार प्रक्रिया ही घडली तर सर्वांना आनंदच होतो. महायुतीचा चेहरा पाहून बिनविरोध निवडणुका झाल्या आहेत. कल्याण - डोंबविलीमध्ये शिंदेसेना - भाजप युतीचे उमेदवारच बिनविरोध आले आहेत. ठाकरे म्हणतात की, बिनविरोध सगळेच निवडून आणा. यावर बावनकुळे म्हणाले, लोकशाहीची ही प्रगल्भता आहे. ठाकरेंना अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. त्यांनी अडीच वर्षांत अभ्यासच केला नाही, म्हणून त्यांची ही अवस्था आहे.