महायुतीत कूटनीती जोरात, छत्रपती संभाजीनगरात भाजप-शिंदेसेनेचे २३ प्रभागांत जमण्याची चिन्हे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 13:19 IST2025-12-26T13:17:10+5:302025-12-26T13:19:15+5:30
उर्वरित सहा प्रभागांत आरपीआय आठवले गट, राष्ट्रवादी (अजित पवार)शी चर्चा करून निर्णय होईल; परंतु या दोन्ही पक्षांना सोबत घेऊन शिंसेसेना-भाजपची अद्याप एकही बैठक झालेली नाही.

महायुतीत कूटनीती जोरात, छत्रपती संभाजीनगरात भाजप-शिंदेसेनेचे २३ प्रभागांत जमण्याची चिन्हे
छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीत शिंदेसेना-भाजप महायुती जवळपास निश्चित झाली असून, २३ प्रभागांमधील सुमारे ९१ जागांवर दोन्ही पक्षांमध्ये वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहेत. प्राथमिक आकडेमोडीनुसार ९१ जागांवर महायुतीचे उमेदवार मनपा निवडणुकीच्या मैदानात असतील. यात काही ठिकाणी पूर्ण प्रभाग शिंदसेनेला, तर काही प्रभाग भाजपला सोडण्याचे ठरले आहे.
उर्वरित सहा प्रभागांत आरपीआय आठवले गट, राष्ट्रवादी (अजित पवार)शी चर्चा करून निर्णय होईल; परंतु या दोन्ही पक्षांना सोबत घेऊन शिंसेसेना-भाजपची अद्याप एकही बैठक झालेली नाही. बंडखोरी टाळण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कोणता प्रभाग कुणाला हे समोर न आणण्याची रणनीती ठरली आहे. महायुती झाल्यानंतर त्याची संयुक्त घोषणा करण्यात येणार आहे.
महापालिका निवडणुकीत भाजप व शिंदेसेना एकत्रित लढतील, असे आदेश मुख्यमंत्री, महसूल मंत्र्यांनी दिल्यामुळे भाजपच्या कोअर कमिटीने बुधवारी अंतर्गत जागावाटपाचे सूत्र तयार केले. गुरुवारी दुपारी दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप शहराध्यक्ष किशोर शितोळे यांच्या निवासस्थानी तीन तास चर्चा केली. दोन्ही पक्षांच्या बाजूने चर्चा अंतिम टप्प्यावर आली असली तरी काही ठिकाणच्या कारणांवरून गुरुवारच्या बैठकीत अंतिम निर्णय झाला नाही. युतीसाठी ही पाचवी बैठक होती. शुक्रवारी दिवसभरात पुन्हा जागावाटपाची बैठक होणार आहे.
या बैठकीत भाजपकडून ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे, खा. डॉ. भागवत कराड, आ. संजय केणेकर, किशोर शितोळे, समीर राजूरकर तर शिंदेसेनेकडून जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, विकास जैन, ऋषिकेश जैस्वाल हे सहभागी झाले.
महापौर आमचाच होईल
आम्ही ९१ जागा युतीमध्ये लढण्याबाबत प्राथमिक चर्चा पूर्ण झाली आहे. जागावाटपाचे सूत्र शिंदेसेनेकडून आल्यानंतर पुढील निर्णय होईल. महायुती ८० जागांवर विजयी होईल, महापौर आमचाच होईल. महायुतीचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे. दोन्ही पक्ष एका स्टेजवर आले आहेत. शुक्रवारी सकाळी पुन्हा बैठक होणार आहे. बहुतांश जागांवर एकमत झाले आहे. आपापल्या कार्यकर्त्याला न्याय द्यायची भूमिका आहे. दोन्ही पक्षांकडे इच्छुकांची गर्दी आहे.
- अतुल सावे, ओबीसी कल्याण मंत्री
दोघांनाही सोयीचे
जागावाटपाची बोलणी पूर्ण होत आली आहे. दोघांनाही युतीत लढणे सोयीचे आहे.
- किशोर शितोळे, शहर जिल्हाध्यक्ष, भाजप
महसूल मंत्र्यांसमोर मांडणार सूत्र...
जागावाटपाचे सूत्र महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर शुक्रवारी मांडण्यात येणार आहे. विभागीय कार्यालयात ते बैठक घेऊन त्यावर चर्चा करतील. त्यानंतर जागावाटपाचा मसुदा मुंबई प्रदेश कार्यालयात अंतिम होईल. रविवारी किंवा सोमवारी सायंकाळपर्यंत महायुतीतील जागावाटपाचा निर्णय जाहीर करण्यात येईल. या दिशेने दोन्ही पक्षांच्या बाजूने तयारी सुरू असून, यात रिपाइं आठवले गट आणि राष्ट्रवादी (अजित पवार)चा विचार सध्या तरी केलेला नाही.
शिंदेसेनेच्या मुख्य समन्वय समितीची बैठक
शिंदेसेनेचे नेते पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानी गुरुवारी रात्री ७वाजता मुख्य समन्वय समितीची बैठक पार पडली. या बैठकीला पालकमंत्री शिरसाट, खा. संदीपान भुमरे, आ. प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, माजी महापौर विकास जैन आणि ऋषीकेश जैस्वाल यांनी सहभाग नोंदविला. भाजपसोबतच्या झालेल्या बैठकीतील जागा वाटपाबाबत झालेल्या चर्चेची माहिती देऊन त्यावर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
शिंदेसेनेच्या सूत्रांची माहिती
महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी शिंदेसेना आणि भाजप कोअर कमिटीची पाचवी बैठक कोणत्याही निर्णयाविना पार पडली. या बैठकीत हिंदूबहुल ८८ जागांपैकी ५५ जागांवर भाजपने दावा सांगितला आणि शिंदेसेनेला केवळ ३३ जागा सोडण्याची तयारी दर्शविल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. सूत्रांनी सांगितले की, महापालिका निवडणूक भाजप आणि शिंदेसेनेने युती करून लढविण्याचे निर्देश मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिले. यामुळे दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू आहे. गुरुवारी पाचवी बैठक भाजपचे शहराध्यक्ष किशोर शितोळे यांच्या निवासस्थानी पार पडली. बैठकीत भाजपने ५५ जागांवर दावा सांगितला आणि शिंदेसेनेने ३३ जागा लढवाव्यात, असा आग्रहही धरला. मागील निवडणुकीत शिवसेनेने जिंकलेल्या जागांवरही भाजपने दावा सांगितल्याचे सूत्राने सांगितले. मात्र, शिंदेसेनेचा फिप्टी-फिप्टीचा फॉर्म्युला भाजपला मान्य नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
३ तास भाजप कोअर कमिटीची चर्चा
महापालिका निवडणुकीत भाजप व शिंदेसेना एकत्रित लढतील, असे आदेश मुख्यमंत्री, महसूल मंत्र्यांनी दिल्यामुळे भाजपच्या कोअर कमिटीने बुधवारी अंतर्गत जागावाटपाचे सूत्र तयार केले. गुरुवारी दुपारी दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप शहराध्यक्ष किशोर शितोळे यांच्या निवासस्थानी तीन तास चर्चा केली.