उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांचे महापालिकेत ‘स्वकीयांसाठीच’ जोरदार शक्तिप्रदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 19:45 IST2026-02-11T19:45:13+5:302026-02-11T19:45:55+5:30
गुलालाची मुक्त उधळण, ठोलताशे, फटाके, क्रेनद्वारे हार; पोस्टरवर शिरसाटांचा फोटोच नाही

उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांचे महापालिकेत ‘स्वकीयांसाठीच’ जोरदार शक्तिप्रदर्शन
छत्रपती संभाजीनगर : पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या मर्जी विरोधात राजेंद्र जंजाळ यांनी उपमहापौरपदाची उमेदवारी शिंदेसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून मिळविली होती. मंगळवारी उपमहापौरपदी निवड होताच जंजाळ यांच्या समर्थकांनी महापालिका प्रांगणात एकच जल्लोष केला. गुलालाची मुक्त उधळण करीत ‘आता कसं वाटतंय.. गोड गोड वाटतंय...’ म्हणत आपल्याच पक्षातील नेत्यास डिवचण्याचा प्रयत्न केला. विशेष बाब म्हणजे जंजाळ समर्थकांनी आणलेल्या पोस्टर्समधून पालकमंत्री शिरसाट यांचा फोटो गायब होता.
महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक झाल्यानंतर भाजपने कोणताही जल्लोष केला नाही. नवनिर्वाचित महापौर समीर राजुरकर यांनी हार, तुरे, पुष्पगुच्छ, शाल काहीही आणू नये, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. दुसऱ्या बाजूला निवडणूक संपताच शिंदेसेनेचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांचे शेकडो समर्थक मनपा प्रांगणात दाखल झाले. गुलालाची उधळण करीत जोरदार घोषणाबाजी सुरू केली. कार्यकर्त्यांच्या हातात आकर्षक पोस्टर्स होते. हे पोस्टर्स मनपातील अधिकारी, कर्मचारी, विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधून घेत होते. ‘मोठ-मोठे गार केले, गंमत नाही, तू कोणाच्याही नादी लाग रग्गीलच्या नादी नको, लय महागात पडल’, असे पोस्टर्स झळकत होते.
तरीही शिरसाटांनी शिष्टाई पूर्ण केली...
मनपा प्रांगणात शिंदेसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आलेला असतानाही संजय शिरसाट उपमहापौरांच्या कक्षात जंजाळ यांना खुर्चीवर बसविण्यासाठी सोबत गेले. शिरसाट यांनी मनपा मुख्यालय सोडताच जंजाळ खाली आले. त्यांचे स्वागत क्रेनद्वारे आणलेल्या हारने करण्यात आले. मनपा मुख्यालयापासून जंजाळ यांची भव्य रॅलीही वाजत गाजत काढण्यात आली.