'भाजपमध्ये नेतृत्वावरून संभ्रम, त्यामुळेच सत्तास्थापनेला विलंब'; अंबादास दानवेंचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2024 04:55 PM2024-11-30T16:55:35+5:302024-11-30T16:55:58+5:30
जनतेने नाकारलेले मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहे, याच कारणामुळे ईव्हीएमवर आक्षेप घेता येऊ शकतो: अंबादास दानवे
छत्रपती संभाजीनगर: राज्यात अनेक प्रश्न आहेत. निवडणुकीचा निकाल घोषित होऊन आठ दिवस झाले तरी राज्यात सरकार स्थापन झाले नाही. यामुळे तातडीने सरकार स्थापन होणे गरजेचे आहे. भारतीय जनता पक्षात नेतृत्व कोणी करावे ,यावर संभ्रम असल्यानेच सत्ता स्थापन होण्यास विलंब होत असल्याचा दावा विधान परिषदेचे विरेाधीपक्षनेते आ.अंबादास दानवे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला.
आ. दानवे म्हणाले की, निवडणुकीत जय-परायजय ही प्रक्रिया आहे. पण जनतेने नाकारलेले मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहे, याच कारणामुळे ईव्हीएमवर आक्षेप घेता येऊ शकतो. ईव्हीएमवर आक्षेप घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काँग्रेसनेही याविषयी स्पष्ट भूमिका घेतली आहे. उपोषण करीत असलेले बाबा आढाव हे एक जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांची दखल शासनाने घ्यावी, असे मत दानवे यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, लाडक्या बहिणींना २१०० रूपये देण्याची घोषणा महायुतीने केली होती. पण आम्ही तर म्हणतो की, लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळायला हवे. असेही ते म्हणाले. दरम्यान, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्याविषयी आपण वैयक्तिक भाष्य केलेले नाही. तर शिवसेनेची भूमिका म्हणून बोललो असल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले.
दोन्ही ठाकरे एकत्र येण्याचा निर्णय तेच घेऊ शकातात
मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे, याविषयी चर्चा सुरू आहे, हा निर्णय होईल का, या प्रश्नाचे उत्तर देताना आमदार दानवे म्हणाले की, हे दोन्ही ठाकरे बंधूच एकत्र येण्याचा निर्णय घेऊ शकतात. आम्ही त्यांच्या भूमिकेत का पडावे असेही ते म्हणाले.