छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धवसेनेच्या गटनेतेपदी नगरसेवक गणेश लोखंडे यांची निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 18:46 IST2026-02-06T18:46:18+5:302026-02-06T18:46:54+5:30
विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्याकडे कागदपत्रे सादर केली.

छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धवसेनेच्या गटनेतेपदी नगरसेवक गणेश लोखंडे यांची निवड
छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या उद्धवसेनेच्या सहा नगरसेवकांनी आज शुक्रवारी(दि. ६) त्यांच्या गटनेतेपदी नगरसेवक गणेश लोखंडे यांची निवड केली. उद्धवसेनेच्या नगरसेवकांनी आज विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांची भेट घेत त्यांना याविषयीची कागदपत्रे सादर केली.
महापालिका निवडणुकीनंतर ३० दिवसांच्या आत प्रत्येक पक्षांना त्यांच्या निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी एका नगरसेवकांची गटनेतेपदी निवड करावी लागते. ही निवड केल्याची कागदपत्रे विभागीय महसूल आयुक्त यांच्याकडे सादर करणे बंधनकारक आहे. यानुसार शुक्रवारी उद्धवसेनेचे नेते अंबादास दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक गणेश कौतिकराव लोखंडे यांची उद्धवसेनेच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली.
यावेळी शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, हरिभाऊ हिवाळे, दिग्विजय शेरखाने, ज्ञानेश्वर डांगे, नगरसेवक रशीद मामू, सावित्रीबाई वाणी, सचिन खैरे, सुनिता सोनवणे, वैशाली कोरडे, हनुमान शिंदे व रामेश्वर कोरडे आदी उपस्थित होते.