Chh. Sambhajinagar Municipal Election Results 2026: छत्रपती संभाजीनगरमध्ये 'कमळ' बहरले! भाजपने घेतली मोठी आघाडी; एमआयएमचे लक्षणीय यश
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 15:25 IST2026-01-16T15:22:16+5:302026-01-16T15:25:46+5:30
छत्रपती संभाजीनगरमध्ये 'कमळ' बहरले! ५२ जागांसह भाजपने घेतली मोठी आघाडी; एमआयएमच्या २४ जागांनी राजकीय समीकरणे बदलली

Chh. Sambhajinagar Municipal Election Results 2026: छत्रपती संभाजीनगरमध्ये 'कमळ' बहरले! भाजपने घेतली मोठी आघाडी; एमआयएमचे लक्षणीय यश
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या ११५ जागांसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत असून, भारतीय जनता पक्षाने शहरात आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार, भाजप ५२ जागांवर आघाडीवर असून बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ५८ जागांच्या आकड्याकडे त्यांची वेगाने वाटचाल सुरू आहे. दुसरीकडे, इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखालील एमआयएमने २४ जागांवर मुसंडी मारत सर्वांना धक्का दिला आहे.
पक्षनिहाय सद्यस्थिती (एकूण ११५ जागा):
भाजप: ५२ (बहुमताच्या उंबरठ्यावर)
एमआयएम: २४ (दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरण्याची शक्यता)
शिवसेना (शिंदे): १४ (स्वतंत्र लढल्याचा फटका बसल्याचे चित्र)
शिवसेना (UBT): ०६ (शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात मोठी घसरण)
वंचित बहुजन आघाडी: ०४
काँग्रेस/राष्ट्रवादी (शप): प्रत्येकी ०१
शिंदेसेनेला मोठा धक्का
या निवडणुकीत सर्वात मोठा फटका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला बसल्याचे दिसत आहे. स्वतंत्रपणे निवडणूक लढवल्यामुळे मतांचे विभाजन झाले आणि केवळ १४ जागांवर त्यांना समाधान मानावे लागत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला केवळ ६ जागा मिळाल्याने 'मशाल' थंडावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
एमआयएमची जोरदार 'एन्ट्री'
मुस्लिम बहुल आणि काही मिश्र लोकवस्तीच्या भागांत एमआयएमने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. २४ जागांच्या आघाडीसह एमआयएमने महापालिकेत आपली ताकद वाढविल्याचे केल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र या निवडणुकीत भोपळा फोडतानाही मोठी कसरत करावी लागली आहे.