छत्रपती संभाजीनगर मनपा निवडणुकीच्या प्रचाराला हिंसेची धार; तीन मोठ्या घटनांमध्ये गुन्हे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 12:30 IST2026-01-08T12:29:22+5:302026-01-08T12:30:15+5:30
बहिणीचा प्रचार करणाऱ्या भावावर शस्त्राने हल्ला, मुख्य हल्लेखोरावर तब्बल १४ गुन्हे दाखल

छत्रपती संभाजीनगर मनपा निवडणुकीच्या प्रचाराला हिंसेची धार; तीन मोठ्या घटनांमध्ये गुन्हे दाखल
छत्रपती संभाजीनगर : मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात एकीकडे उमेदवारांचा प्रचार जोर धरत असताना दुसरीकडे वादाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. गरमपाणी परिसरात एका महिला उमेदवाराच्या भावाला प्रचार करताना तब्बल १४ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगाराने बॅनर फाडून शस्त्राने वार केला. तर कैलासनगरात उमेदवाराच्या प्रचार कार्यालयावर ज्वलनशील पदार्थ फेकून जाळण्याचा प्रयत्न झाला. याशिवाय एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील जिन्सी भागात प्रभाग क्रमांक १४ मधील आपल्या उमेदवारांसह पदयात्रेसाठी पोहोचले असता त्यांच्यावर एका गटाने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.
रिक्षाचालक असलेले मिथुन रतन जाधव (३५) यांची बहीण वर्षा जाधव (२८, दोघे रा. जयभीमनगर) या प्रभाग क्रमांक ५ मधून वंचित बहुजन आघाडीकडून महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवार आहेत. ६ जानेवारीला सायंकाळी मिथुन हे पक्ष, भोंगा, पक्षाचा ध्वज तसेच उमेदवार व नेत्यांची छायाचित्रे असलेल्या रिक्षातून बहिणीचा प्रचार करत होते. सायंकाळी पाचच्या सुमारास गरमपाणी परिसरात प्रचार सुरू असताना अरबाज करीम खान, अन्सार अन्सारी व अब्दुल समीर उर्फ गुड्डू (सर्व रा. गरमपाणी परिसर) यांनी त्यांना परिसरात न येण्याची धमकी दिली. त्यानंतर शस्त्राने रिक्षावरील बॅनर फाडून मिथुन यांच्या चेहऱ्यावर वार व मारहाण केली. मिथुन यांच्यासोबत असलेल्या किशोर वाघ यांनाही आरोपींनी मारहाण केली. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर मिथुन यांनी क्रांतीचौक ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून मारहाणीसह ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत अरबाज करीम खान, अब्दुल समीर उर्फ गुड्डू व अन्सार अन्सारी यांच्यावर पोलिस उपनिरीक्षक देविदास शेवाळे यांनी गुन्हा दाखल केला.
दोन दिवस पोलिस कोठडीत
घटनेची दखल घेत सहायक पोलिस आयुक्त सागर देशमुख यांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. हल्लेखोरांचा शोध घेत अरबाज करीम खान (२८) याच्यासह अन्य दोघांना रात्री अटक केली. बुधवारी दुपारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त देशमुख यांनी दिली. अरबाजवर तब्बल १४ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
उमेदवाराचे प्रचार कार्यालय जाळण्याचा प्रयत्न
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रभाग क्रमांक १६ चे उमेदवार मयूर सोनवणे यांचे कैलासनगरात प्रचार कार्यालय आहे. ६ जानेवारीला काही पदाधिकारी व कार्यकर्ते कार्यालयाच्या मागील बाजूस झोपले होते. एफआयआरमधील आरोपानुसार, पहाटे ४:३० वाजता बाळू उर्फ योगेश मुळे याने प्रचार कार्यालयाला आग लावली. समोर राहणारे किशोर भुजबळ यांनी त्याला हा प्रकार करताना पाहिले. सीसीटीव्ही फुटेजमध्येही बाळू मंडपाला आग लावताना दिसून आल्याचा दावा करण्यात आला आहे. याप्रकरणी पक्षाचे पदाधिकारी योगेश शहाणे यांच्या तक्रारीवरून जिन्सी ठाण्यात बाळू उर्फ योगेश मुळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला
एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील बुधवारी दुपारी ०१:३० वाजेच्या सुमारास जिन्सी भागात प्रभाग क्रमांक १४ मधील आपल्या उमेदवारांसह पदयात्रेसाठी पोहोचले. पदयात्रा काही अंतरावर गेल्यानंतर समोरून काँग्रेसचे उमेदवार कलीम कुरैशी समर्थकांसह आले. एमआयएम- काँग्रेसचा मोठा गट समोरासमोर आला. एकमेकांविरोधात घोषणाबाजी सुरू झाली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. इम्तियाज जलील एका काळ्या रंगाच्या चारचाकीतून निघत असताना काही तरुणांनी त्यांच्या वाहनावरच हल्ला चढविला. या घटनेनंतर जिन्सी भागात तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी काँग्रेस उमेदवार हबीब कुरेशी, कलीम कुरेशीसह ५० जणांच्या जमावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.