छत्रपती संभाजीनगरचा 'महापौर' ठरला! भाजपचा समीर राजूरकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 12:05 IST2026-02-06T12:03:59+5:302026-02-06T12:05:00+5:30

भाजपच्या समीर राजूरकर यांच्यावर छत्रपती संभाजीनगरच्या विकासाची धुरा.

Chhatrapati Sambhajinagar Mayor: BJP's Sameer Rajurkar's name confirmed | छत्रपती संभाजीनगरचा 'महापौर' ठरला! भाजपचा समीर राजूरकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब

छत्रपती संभाजीनगरचा 'महापौर' ठरला! भाजपचा समीर राजूरकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या महापौरपदी कोण विराजमान होणार? या प्रश्नाचे उत्तर अखेर मिळाले आहे. शहराचे महापौरपद 'खुले' (सर्वसाधारण) जाहीर झाल्याने अनेक नावे पुढे आली होती. मात्र, भाजपने प्रदीर्घ चर्चा करून आपला पत्ता उघड केला आहे. समर्थनगर प्रभागाचे अभ्यासू नगरसेवक समीर राजूरकर यांची शहराच्या 'प्रथम नागरिक' पदाचे उमेदवार म्हणून भाजपने निवड केली आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष असल्याने आता निवडीची औपचारिकात बाकी आहे. 

वेगवान राजकीय घडामोडी 
आरक्षण जाहीर झाल्यानंतर भाजपच्या नगरसेवकांमध्ये महापौर पदासाठी चुरस वाढली होती. दरम्यान,  स्थानिक कोअर कमिटीच्या अनेक बैठकांमधून प्रामुख्याने चार नावांची चर्चा होती. मात्र, एकवाक्यता होत नसल्याने निर्णय मुंबईतील वरिष्ठ नेतृत्वावर सोपविण्यात आला. त्यानंतर आज भाजपच्या गोटातून एक नाव समोर आले.  दुसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलेले आणि प्रशासकीय कामाचा अनुभव असलेले समीर राजूरकर यांच्या नावावर एकमत झाले. शहराध्यक्ष किशोर शितोळे यांनी या निवडीला दुजोरा दिला आहे. गुरुवारी सकाळीच गोविंद केंद्रे यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली होती. महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याचा आज, शुक्रवारी शेवटचा दिवस आहे. राजुरकर आज उमेदवारी अर्ज दाखल करतील. 

सत्तेचे गणित 
११५ सदस्यीय महानगरपालिकेत भाजपचे ५७ नगरसेवक निवडून आले आहेत. बहुमतासाठी ५८ मतांची आवश्यकता असताना, भाजप आता सर्वात मोठा पक्ष म्हणून शहराचा कारभार हाती घेणार आहे. राजूरकर यांच्या निवडीमुळे भाजपमधील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, आता औपचारिक निवड प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सर्वसाधारण प्रवर्गातील यापूर्वीचे महापौर
गजानन बारवाल (१८-४-१९९६ ते ७-५-१९९७),
सुदाम सोनवणे (२०-४-१९९९- ते २९-४-२०००),
किशनचंद तनवाणी (२९-४-२००५ ते ४-११-२००६),
विजया रहाटकर (२९-१०-२००७ ते २८-४-२०१०),
त्र्यंबक तुपे (२९-४-२०१५ ते ३०-११-२०१६)
भगवान घडमोडे (१४-१२-२०१६ ते २८-१०-२०१७).

Web Title : भाजपा के समीर राजूरकर छत्रपति संभाजीनगर के महापौर चुने गए!

Web Summary : भाजपा के समीर राजूरकर छत्रपति संभाजीनगर के महापौर चुने गए। लंबी चर्चा के बाद भाजपा ने अनुभवी पार्षद को इस पद के लिए चुना। भाजपा के बहुमत के साथ, चुनाव अब केवल एक औपचारिकता है।

Web Title : BJP's Sameer Rajurkar elected as Mayor of Chhatrapati Sambhajinagar!

Web Summary : Sameer Rajurkar of BJP is elected as the Mayor of Chhatrapati Sambhajinagar. After much discussion, BJP chose the experienced corporator for the position. With BJP holding majority, the election is now a mere formality.