तुम्ही संभाजीनगरचे पालक, पण देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मालक; संजय केनेकर शिरसाटांवर संतापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 14:58 IST2026-01-13T14:57:40+5:302026-01-13T14:58:38+5:30
या जनतेने तुमच्याकडे पाठ फिरवली तर तुम्हाला परत शहरात राहता येणार नाही. ज्या मामा चौकातून तुम्ही मोठे झाला तिथेच तुमचे विसर्जन होऊ शकते असा घणाघात संजय केनेकरांनी संजय शिरसाट यांच्यावर केला.

तुम्ही संभाजीनगरचे पालक, पण देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मालक; संजय केनेकर शिरसाटांवर संतापले
छत्रपती संभाजीनगर - किती दिवस शिवसैनिक तुमची गुलामी सहन करतील? पदमपुऱ्यात तुम्ही साधे मंगल कार्यालय उभे करू शकले नाहीत. तुम्ही छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आहात, आम्ही महाराष्ट्राचे मालक आहोत. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मालक आहेत हे विसरू नका असं विधान भाजपाचे आमदार संजय केनेकर यांनी करत शिंदेसेनेचे नेते संजय शिरसाट यांच्यावर निशाणा साधला.
आमदार संजय केनेकर म्हणाले की, शिवसेना वाढवण्याचा आणि महाराष्ट्रात झंझावत निर्माण करण्यात खऱ्या अर्थाने कुणाचा सिंहाचा वाटा असेल तर नारायण राणे यांचा आहे. जे शिवसेनेच्या भरवशावर मोठे झाले त्यांनी पदमपुऱ्यात काय केले? ज्या हिंदुत्वाच्या जीवावर तुम्ही मोठे झाला आणि पदमपुरा सोडून व्हाइट हाऊसला गेलात, तिथल्या शिवसैनिकांची अवस्था काय होती ही पाहिली का? असा प्रश्न त्यांनी विचारला.
तसेच तुम्ही शिवसेनेचे तिकीट देतानाही कुणाला दिले? आमच्या भाजपाचा आदर्श घ्यायचा होता, पक्षाने आमदार, खासदार यांच्या मुलांना, नातेवाईकांना कुणालाही तिकीट दिले जाणार नाही हा आमचा आदर्श आहे. तुम्ही तुमच्या मुलीकरता पदमपुरा दावावर लावले. किती दिवस शिवसैनिक तुमची गुलामी सहन करतील? तुम्ही याठिकाणी साधे मंगल कार्यालय उभं करू शकले नाहीत. तुम्ही छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आहात, आम्ही महाराष्ट्राचे मालक आहोत. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मालक आहेत हे विसरू नका. तुम्ही कमळाच्या पिचवर खेळताय हे लक्षात ठेवा असा टोला भाजपा आमदार संजय केनेकरांनी शिंदेसेनेला लगावला.
दरम्यान, पदमपुरा वासियांनो एक एक शिवसैनिकांचा हिशोब तुम्हाला करायचा आहे. किती घरे उद्ध्वस्त केली, ज्यांच्या जीवावर तुम्ही मोठे झाले. त्या व्हाईट हाऊसमध्ये जाऊन बसले. तिकीट कुणाला दिले, तुमच्या पीएला आणि पोरांना..शिवसैनिक कुठे गेले होते. तुम्ही मोठे केलेले कंत्राटदार नगरसेवक करता, तुम्ही पीएला नगरसेवक करता, तुमच्या पोरांना नगरसेवक करतात. परंतु ज्यांनी समर्पण केले त्यांच्या लेकरांना विचारा त्यांची काय अवस्था आहे. या जनतेने तुमच्याकडे पाठ फिरवली तर तुम्हाला परत शहरात राहता येणार नाही. ज्या मामा चौकातून तुम्ही मोठे झाला तिथेच तुमचे विसर्जन होऊ शकते असा घणाघात संजय केनेकरांनी संजय शिरसाट यांच्यावर केला.
आपला कॅप्टन कमळाचा, महाराष्ट्रात परिवर्तन आम्हीच करू
हिंदुत्वाच्या गप्पा आम्हाला शिकवू नका. जनावरांची अवैध कत्तल येथे सुरू आहे. तुमच्या डोळ्यादेखत होते. तुम्ही पालकमंत्री असताना काय चाललंय हे आम्हाला माहिती आहे. २५ वर्ष झाले फक्त ८ ते १० दिवस लोकांना पाणी मिळते. हे तुम्ही विसरला. तुमच्याकडे २५ नळ आहेत परंतु एक नळ शिवसैनिकाच्या घरात नाही. ही आज परिस्थिती आहे. त्यामुळे हिशोब होणारच. तुम्ही ज्यांच्याशी भांडले त्यांच्या पायाही पडले तरी विसर्जन निश्चित आहे. माझ्याकडे खूप हिशोब आहे. जनशक्तीविरोधात धनशक्ती ही निवडणूक आहे. आम्ही रिक्षावाल्याला तिकीट दिले, तुम्ही कोणाला दिले? आता जर या लोकांचे विसर्जन केले नाही तर पुन्हा दादागिरी होईल. आमचा कॅप्टन कमळाचा आहे आणि या महाराष्ट्रात परिवर्तन आपणच करू शकतो असं आवाहनही संजय केनेकरांनी जनतेला केले.