छ. संभाजीनगर मनपा निवडणूक: अखेरच्या क्षणी झुंबड; वेळ संपल्याने मतदारांचा पोलिसांशी वाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 18:55 IST2026-01-15T18:51:22+5:302026-01-15T18:55:39+5:30
राज्य निवडणूक आयोगाने दिलेली ५:३० वाजेपर्यंतची वेळ संपताच पोलिसांनी केंद्रांचे गेट बंद केले

छ. संभाजीनगर मनपा निवडणूक: अखेरच्या क्षणी झुंबड; वेळ संपल्याने मतदारांचा पोलिसांशी वाद
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या ११५ जागांसाठी आज पार पडलेल्या मतदान प्रक्रियेचा शेवट अत्यंत नाट्यमय झाला. दिवसभर अत्यंत संथ गतीने सुरू असलेल्या मतदानाने सायंकाळी ४ नंतर अचानक वेग घेतला. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने दिलेली ५:३० वाजेपर्यंतची वेळ संपताच पोलिसांनी केंद्रांचे गेट बंद केल्याने उस्मानपुरा आणि गणेशनगर यांसारख्या भागात मोठा गोंधळ उडाला.
शेवटच्या क्षणी केंद्रांवर 'धावपळ'
सकाळी ७:३० वाजता शहरातील १२६७ केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली होती. ११ लाख मतदार आपला नगरसेवक निवडणार असल्याने प्रशासनाने चोख तयारी केली होती. मात्र, सकाळच्या सत्रात मतदारांनी पाठ फिरवल्याचे चित्र होते. सायंकाळी ५:३० ची वेळ जवळ येताच मतदारांनी केंद्रांकडे धाव घेतली. गणेशनगर येथील स्वामी विवेकानंद विद्यालयात ५:३० वाजता गेट बंद करण्यात आले, मात्र अनेक मतदार अजूनही रांगेत उभे होते. यामुळे पोलीस आणि मतदारांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. उस्मानपुरा भागातही मतदारांनी पोलिसांशी हुज्जत घालत आत जाण्यासाठी प्रयत्न केला. एका केंद्रावर तर महिलेने तर गेट बंद होण्याच्या वेळी पळत जाऊन आतमध्ये प्रवेश केला.
निवडणुकीचे तांत्रिक पैलू
प्रभाग पद्धतीमुळे एका मतदाराला तीन ते चार मतदान करावे लागत असल्याने रांगा संथ गतीने सरकत होत्या. ही बाब लक्षात घेऊन मनपा प्रशासनाने केंद्रांवर विजेची व्यवस्था केली होती, जेणेकरून ५:३० च्या आत रांगेत असलेल्यांना मतदान करता येईल. मात्र, जे ५:३० नंतर केंद्रावर पोहोचले, त्यांना पोलिसांनी मज्जाव केला.
अशी होती प्रशासकीय तयारी
उमेदवार: ८५९ (११५ जागांसाठी)
मतदान केंद्र: १२६७ (ज्यापैकी ५३७ केंद्रांवर वेबकास्टिंग)
पोलीस बंदोबस्त: ३ हजार ३०७ अधिकारी-कर्मचारी, १९२८ होमगार्ड आणि एसआरपीएफच्या तुकड्या.
यंत्रणा: ४ हजार १६२ ईव्हीएम आणि १२६७ कंट्रोल युनिट्स.
एकूण मतदार संख्या - ११,१७,४७७
पुरुष मतदार - ५,७४,५२८
महिला मतदार - ५,४२,८६५
इतर मतदार- ८४
निवडणूक रिंगणातील उमेदवार:
एकूण उमेदवार- ८५९ पुरुष उमेदवार - ४८०, महिला उमेदवार - ३७९
मतदान केंद्र -१२६७
निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी: ५५८८ (मतदान केंद्राध्यक्ष, पीओ १ ते ३)
शुक्रवारी मतमोजणी:
सर्व २९ प्रभागांची मतमोजणी एकाच वेळी सुरू केली जाणार
एकूण ०४ मतमोजणी केंद्र
- सेंट फ्रान्सिस हायस्कूल, जालना रोड.
-शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, रेल्वे स्टेशन रोड, उस्मानपुरा
- गरवारे सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क, एमआयडीसी चिकलठाणा.
-शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, उस्मानपुरा.