छ. संभाजीनगर भाजपमधील 'राडा' शमला, 'बंड' उरलं! भदाणेंचा निर्धार कायम, मराठेंची माघार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 16:19 IST2026-01-02T16:15:43+5:302026-01-02T16:19:26+5:30
उमेदवारी वाटपावरून छत्रपती संभाजीनगरमध्ये भारतीय जनता पक्षात अभूतपूर्व गोंधळ झाला होता

छ. संभाजीनगर भाजपमधील 'राडा' शमला, 'बंड' उरलं! भदाणेंचा निर्धार कायम, मराठेंची माघार
छत्रपती संभाजीनगर: भारतीय जनता पक्षातील उमेदवारी वाटपावरून छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या अभूतपूर्व गोंधळानंतर आज चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. प्रभाग क्रमांक २ मधून उमेदवारी न मिळाल्याने प्रचार कार्यालयासमोर चक्क आत्मदहनाचा प्रयत्न करणारे प्रशांत भदाणे पाटील यांनी आपली बंडखोरी कायम ठेवली आहे. तर दुसरीकडे, प्रभाग २० मधून आक्रमक पवित्रा घेतलेल्या आणि उपोषणास बसलेल्या दिव्या मराठे यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या विनंतीनंतर आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. दरम्यान, अनेक अपक्ष आणि बंडखोरांनी उमेदवारी मागे घेतल्याने पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची डोकेदुखी काही अंशी कमी झाल्याची चर्चा आहे.
रॉकेल ओतणारे भदाणे पाटील आता 'मैदानात'
काही दिवसांपूर्वी भाजपच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयासमोर प्रशांत भदाणे पाटील यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. "रात्रंदिवस पक्षासाठी झटलो पण तिकीट मंत्र्यांच्या पीएला दिलं," असा आरोप करत त्यांनी खासदार, मंत्र्यांच्या गाड्या रोखल्या होत्या. नेत्यांनी मनधरणी करूनही भदाणे पाटील यांनी आपला पवित्रा बदललेला नाही. त्यांनी प्रभाग २ मधून अपक्ष म्हणून लढण्याचा निर्धार केल्याने भाजपच्या अधिकृत उमेदवारासमोर आता मोठे आव्हान उभे राहिले आहे.
दिव्या मराठेंची भावनिक माघार
दुसरीकडे, प्रभाग २० मध्ये उमेदवारीसाठी आक्रमक झालेल्या दिव्या मराठे यांनी अखेर माघार घेतली आहे. त्यांनी भाजप प्रचार कार्यालयात उपोषण करून शहराध्यक्ष आणि नेत्यांना धारेवर धरले होते. "हकालपट्टी झाली तरी चालेल पण न्याय हवा," असे म्हणणाऱ्या मराठे यांना पक्षाच्या 'शिस्ती'चा विचार करून माघार घेण्यास यश आले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे पक्षातील अंतर्गत संघर्ष तात्पुरता शमला असला तरी, कार्यकर्त्यांमधील नाराजीची धुसफूस कायम आहे.