"पक्षासाठी केसेस अंगावर, तिकीट मात्र दुसऱ्यांना"; संभाजीनगरात भाजप पदाधिकाऱ्यांचा राडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 12:33 IST2025-12-30T12:32:00+5:302025-12-30T12:33:16+5:30
Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Election 2026: "जुन्या कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्याच उचलायच्या का?" तिकीट नाकारल्याने भाजपच्या रणरागिणींचा प्रचार कार्यालयात राडा

"पक्षासाठी केसेस अंगावर, तिकीट मात्र दुसऱ्यांना"; संभाजीनगरात भाजप पदाधिकाऱ्यांचा राडा
छत्रपती संभाजीनगर: महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी वाटपावरून भाजपमधील अंतर्गत खदखद आता चव्हाट्यावर आली आहे. प्रभाग २० मधील इच्छूक उमेदवार दिव्या उल्हास मराठे यांनी तिकीट नाकारल्याने आज भाजपच्या प्रचार कार्यालयात नेत्यांना अक्षरशः धारेवर धरले. "१८ वर्षे पक्षाचे काम केले, १८ केसेस अंगावर घेतल्या, पण आज १५ दिवसांपूर्वी आलेल्यांना तिकीट दिले जात आहे," असा संताप व्यक्त करत दिव्या मराठे यांनी भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर हल्लाबोल केला.
निष्ठावंतांची अवहेलना?
दिव्या मराठे यांनी यावेळी मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड आणि शहराध्यक्ष किशोर शितोळे यांच्यावर अन्यायाचा थेट आरोप केला. त्या म्हणाल्या, "जेव्हा पक्ष कठीण काळात होता, तेव्हा माझी मुले लहान असतानाही मी घरादाराचा विचार न करता पक्षाचे काम केले. आज पक्ष एक नंबरवर आल्यावर आम्हा जुन्या कार्यकर्त्यांना डावलले जात आहे. नेत्यांच्या बायका एसीमध्ये बसतात आणि कार्यकर्त्या महिलांनी मात्र रस्त्यावर उतरून संघर्ष करायचा का?" असा बोचरा सवाल त्यांनी उपस्थित केला.
आमरण उपोषणाचा इशारा
केवळ दिव्या मराठेच नव्हे, तर भाजपमधील अनेक महिला कार्यकर्त्यांमध्ये या उमेदवारी वाटपावरून नाराजी असल्याचे चित्र आहे. "मी रडणार नाही, तर या अन्यायाविरोधात लढणार आहे. मी अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असून थेट पक्ष कार्यालयातच आमरण उपोषणाला बसणार आहे," असा इशाराही त्यांनी दिला.
अनेक नाराज पदाधिकारी प्रचार कार्यालयात धडकले
दिव्या मराठे यांच्या सारखेच अनेक निष्ठावान कार्यकर्ते तिकीट नाकरल्याने नाराज होऊन प्रचार कार्यालयात धडकत आहेत. भाजपचे स्थानिक नेत्यांना जाब विचारण्याचा पवित्र्यात आलेल्या या कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले आहेत. नुकत्याच पक्षात आलेल्या आणि कोणताही अनुभव नसलेल्यांना तिकीट देण्यात प्राधान्य दिल्याने भाजपमध्ये पुन्हा एकदा 'निष्ठावान' विरुद्ध 'आयात' या वादाची ठिणगी पडली आहे. अनेक जुने कार्यकर्ते नाराज असल्याने याचा परिणाम निकालावर होऊ शकतो अशी चर्चा आहे.