वाटाघाटीचा पेच सुटला! भाजपाने मराठवाड्यातील आणखी तीन उमेदवारांची केली घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 16:04 IST2024-10-28T15:55:31+5:302024-10-28T16:04:48+5:30
मराठवाड्यातील आष्टी, देगलूर आणि लातूर शहर या तीन मतदार संघातील उमेदवारांचा भाजपाच्या तिसऱ्या यादीत समावेश आहे.

वाटाघाटीचा पेच सुटला! भाजपाने मराठवाड्यातील आणखी तीन उमेदवारांची केली घोषणा
छत्रपती संभाजीनगर: महायुतीमध्ये मतदारसंघ कोणाच्या वाट्याला किंवा उमेदवार कोण असा पेच असलेल्या मतदारसंघातील उमेवारांची निश्चिती झाली आहे. यात भाजपाच्या वाट्याला आलेल्या आणखी २५ मतदारसंघातील उमेदवार यादी आज प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये मराठवाड्यातील आष्टी, देगलूर आणि लातूर शहर या तीन मतदार संघातील उमेदवारांचा समावेश आहे.
नांदेड जिल्ह्यातील देगलूर मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत जात भाजपाची वाट धरली. मात्र, महायुतीच्या वाटणीत या मतदारसंघावर शिंदेसेनेने दावा केला होता. यामुळे आमदार अंतापूरकर यांची धाकधूक वाढली होती. मात्र, ही जागा सोडवून घेण्यात भाजपला यश आले. आज प्रसिद्ध झालेल्या तिसऱ्या यादीत आमदार जितेश अंतापूरकर यांना भाजपाने देगलूरमधून तिकीट जाहीर केले. येथे त्यांची लढत कॉँग्रेसच्या निवृत्तीराव कांबळे यांच्याशी होणार आहे.
तर बीड जिल्ह्यातील आष्टी मतदारसंघात देखील उमेदवार ठरविण्यासाठी भाजपाने वेळ घेतला. सुरुवातील हा मतदारसंघ अजित पवार गटाकडे असल्याने त्यावर भाजपाने केलेल्या दाव्याला बळ मिळत नव्हते. मात्र, जिल्ह्यातील गेवराई मतदारसंघ भाजपाकडून राष्ट्रवादीकडे गेला. यामुळे अदलाबदली होत आष्टी मतदारसंघ भाजपाकडे गेला. भाजपाने येथून सुरेश धस या अनुभवी नेत्याला मैदानात उतरवले आहे. धस यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तरुण उमेदवार मेहबूब शेख यांचे आव्हान आहे.
दरम्यान, लातूर शहर मधून अर्चना शैलेश पाटील चाकूरकर यांना भाजपाने संधी दिली आहे. त्या माजी लोकसभा अध्यक्ष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील यांच्या सून आहेत. उदगीर येथील लाईफकेअर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या त्या अध्यक्षा असून त्यांचे पती शैलेश पाटील चाकूरकर हे देखील राजकारणात सक्रिय आहेत. कॉँग्रेस नेते आमदार अमित देशमुख यांच्याशी त्यांचा सामना होईल.