कडवी झुंज! सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार यांचा ‘चौकार’ सुरेश बनकर रोखतील का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 19:53 IST2024-11-12T19:51:36+5:302024-11-12T19:53:07+5:30
अब्दुल सत्तार यांचा असलेला तगडा जनसंपर्क व विकासाच्या मुद्यावर ते निवडणूक लढत आहेत, तर सुरेश बनकर यांच्या मागे सहानुभूतीची लाट दिसत आहे. आता यात कोण बाजी मारतो हे आगामी काळात दिसेल.

कडवी झुंज! सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार यांचा ‘चौकार’ सुरेश बनकर रोखतील का?
- श्यामकुमार पुरे
सिल्लोड : विधानसभा मतदारसंघात २००९ ते २०१९ सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या अब्दुल सत्तार यांनी सरत्या मंत्रिमंडळात कृषी, पणन, अल्पसंख्याक मंत्री व पालकमंत्री म्हणून काम केले आहे. त्यांच्यासमोर दोन वेळा पराभूत झालेले भाजपचे सुरेश बनकर यांनी उद्धवसेनेत प्रवेश करून शिवबंधन बांधून महाविकास आघाडीतर्फे उद्धवसेनेकडून उमेदवारी मिळविली आहे. दोघांत कडवी झुंज होताना दिसत आहे. अब्दुल सत्तार यांचा असलेला तगडा जनसंपर्क व विकासाच्या मुद्यावर ते निवडणूक लढत आहेत, तर सुरेश बनकर यांच्या मागे सहानुभूतीची लाट दिसत आहे. आता यात कोण बाजी मारतो हे आगामी काळात दिसेल.
अब्दुल सत्तार यांच्या जमेच्या बाजू :
१) गेल्या १५ वर्षांत तीन वेळा आमदार, महसूल, कृषी, अल्पसंख्याक व पालकमंत्री अशा विविध खात्यांचे मंत्री असताना मतदारसंघात केलेली विकासकामे.
२) मुरब्बी राजकारणी, तगडा जनसंपर्क, कार्यकर्त्यांची मोठी फळी
३) ग्रामीण भागात केलेली विकासकामे
४) लाडक्या बहिणीमुळे महिलांमध्ये असलेली सहानुभूती
५) सर्वदृष्टीने सक्षम उमेदवार
अब्दुल सत्तार यांच्या उणे बाजू :
१) प्रचारावर भाजपने टाकलेला बहिष्कार, शिवसेनेची एकाकी झुंज
२) तीन वेळा निवडणूक आल्यानंतर विकासकामे झाली नसल्याचा आरोप, मुस्लिम समाजाची नाराजी
३) सिल्लोड तालुक्यातील दहशतीचा मुद्दा
४) महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दाखवलेली एकी आणि दानवे यांनी बनकर यांना दिलेले बळ
५) एकवटलेले विरोधक
सुरेश बनकर यांच्या जमेच्या बाजू :
१) गेल्या दोन निवडणुकीत पराभूत झाल्याने निर्माण झालेली सहानुभूती
२) काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धवसेनेने ताकदीने दिलेले समर्थन
३) रावसाहेब दानवे - अब्दुल सत्तार यांच्यातील वादाचा फायदा
४) धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा प्रचार
५) भाजपमधून मदत
सुरेश बनकर यांच्या उणे बाजू
१) कार्यकर्त्यांच्या नेटवर्कचा अभाव
२) उशिरा उमेदवारी जाहीर झाल्याने प्रचाराला कमी मिळालेला वेळ
३) भाजपाच्या राज्यस्तरीय नेत्यांचे सत्तार यांना मिळालेले छुपे सर्मथन
४) लोकसभेतील मदतीची काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांच्याकडून सत्तार यांना परतफेड होणार असल्याची चर्चा
५) सत्तार यांच्याविरोधात आक्रमक प्रचाराचा अभाव