भाजपच्या प्रस्तावाची प्रतीक्षाच; छ. संभाजीनगरात इच्छुकांनी अर्ज भरण्याचे शिंदेसेनेचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 12:28 IST2025-12-29T12:25:20+5:302025-12-29T12:28:56+5:30
छत्रपती संभाजीनगरात मोठी घडामोड; भाजपच्या नवीन प्रस्तावाची प्रतीक्षा शिंदेसेनेला होती. परंतु रात्री उशिरापर्यंत भाजपने प्रस्ताव दिलाच नाही.

भाजपच्या प्रस्तावाची प्रतीक्षाच; छ. संभाजीनगरात इच्छुकांनी अर्ज भरण्याचे शिंदेसेनेचे आदेश
छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस उरलेले असताना भाजपशी युतीची सुरू असलेली चर्चा संपत नसल्यामुळे शिंदेसेनेने इच्छुकांना उमेदवारी अर्ज भरण्याचे आदेश रविवारी मध्यरात्री दिल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली.
रविवारी दिवसभर भाजपच्या नवीन प्रस्तावाची प्रतीक्षा शिंदेसेनेला होती. परंतु रात्री उशिरापर्यंत भाजपने प्रस्ताव दिलाच नाही. त्यामुळे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी रात्री उशिरा त्यांच्या निवासस्थानी पक्षाच्या कोअर कमिटी सदस्यांची बैठक बोलावली. त्या बैठकीत उपरोक्त निर्णय घेण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले.
भाजप- शिंदेसेनेत जागा वाटपावर एकमत झालेले नाही. कालपर्यंत नऊ बैठका झाल्या. परंतु, १२ जागांवर तोडगा निघाला नव्हता. सुधारित प्रस्ताव घेऊन येतो, असे भाजपने सांगितले असलेतरी उशीरापर्यंत शिंदेसेनेला असा कुठलाही प्रस्ताव मिळाला नव्हता.
शिंदेसेना ४१ जागा लढण्यावर ठाम आहे. तर भाजपने शिंदेसेनेला ३३ जागा देण्यास तयारी दर्शवली. शेवटी युतीच्या निर्णयाचा चेंडू वरिष्ठांकडे गेला. सुधारित प्रस्ताव घेऊन आम्ही येतो, असा निरोप भाजपने शिंदेसेनेला दिला होता. भाजपच्या नवीन प्रस्तावावर वाटाघाटी करण्यासाठी शिंदेसेनेची मुख्य समन्वय समिती दिवसभर त्यांच्या प्रस्तावाची प्रतीक्षा करीत होती.
कोणत्या प्रभागांवरून वाद
दोन्ही पक्षांचे प्रभाग क्रमांक २२ आणि २७ मध्ये एकमत होऊ शकले नाही. प्रभाग क्रमांक २२ मधून शिंदेसेनेचा पदाधिकारी व प्रभाग क्रमांक २७ मधून भाजपमधील नवीन इच्छुक आहेत. तसेच मध्य शहरातील प्रभाग क्रमांक १ आणि १७ वरूनही उभय पक्षांत वाद सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
काही लढती मैत्रीपूर्ण शक्य
काही ठिकाणी महायुतीमध्ये, तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते. त्यामुळे जागा वाटपाचा निर्णय रविवारी शक्य झाला नाही. भाजप वरिष्ठांना पाठवलेला मसुदा अद्याप अंतिम झालेला नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांची रविवारी संयुक्त बैठक झाली नाही.
- अतुल सावे, ओबीसी कल्याण मंत्री
प्रस्तावाची वाट पाहतोय
भाजपकडून आज आम्हाला सुधारित प्रस्ताव येणार होता. मात्र, रात्री ९ वाजले तरी त्यांच्या अंतर्गत बैठका सुरूच असल्याचे समजले. त्यांच्याकडून नवीन प्रस्तावच न आल्याने रविवारी उशिरापर्यंत आमची त्यांच्यासोबत चर्चा झाली नाही. १२ जागांवर आमचे एकमत होऊ शकले नाही. तेथे किमान मैत्रीपूर्ण लढत असा प्रस्ताव आला तर त्यावर आम्ही विचार करू.
- संजय शिरसाट, पालकमंत्री तथा शिंदेसेना नेते.