छत्रपती संभाजीनगर पूर्व, मध्य विधानसभेत ‘एमआयएम’च किंग!; जलील यांना भुमरे, खैरेंपेक्षा लिड

By मुजीब देवणीकर | Published: June 5, 2024 04:00 PM2024-06-05T16:00:10+5:302024-06-05T16:02:44+5:30

Aurangabad Lok Sabha Result 2024:

Aurangabad Lok Sabha Result 2024: 'MIM' is king in Chhatrapati Sambhajinagar East, Central Assembly! | छत्रपती संभाजीनगर पूर्व, मध्य विधानसभेत ‘एमआयएम’च किंग!; जलील यांना भुमरे, खैरेंपेक्षा लिड

छत्रपती संभाजीनगर पूर्व, मध्य विधानसभेत ‘एमआयएम’च किंग!; जलील यांना भुमरे, खैरेंपेक्षा लिड

Aurangabad Lok Sabha Result 2024: छत्रपती संभाजीनगर : एमआयएम पक्षाचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी शहरी भागातील मतांवर सर्वाधिक मेहनत घेतली होती. चंद्रकांत खैरे, संदीपान भुमरे यांच्यापेक्षाही जास्त मते त्यांना पूर्व आणि मध्य विधानसभा मतदारसंघातून मिळाली. हा आकडा आणखी वाढला असता पण काही मुस्लिम मते महाविकास आघाडीमुळे चंद्रकांत खैरे यांच्या पारड्यात गेली. या मतांची संख्या किती हे लवकरच बूथनिहाय आकडे समोर आल्यावर कळेल.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलील यांना मध्य विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक ९९ हजार ४५० मते मिळाली होती. त्या खालोखाल पूर्व विधानसभा मतदारसंघाने ९२ हजार ३४७ मते दिली होती. पश्चिम विधानसभेने ७१ हजार २३९ मते दिली होती. या तिन्ही मतदारसंघातील मतांची बेरीज २ लाख ६३ हजार ३६ होती. शहरी मतांची ही जादू इम्तियाज जलील यांना चांगल्या प्रकारे माहीत होती. या मतांना वंचित बहुजन आघाडीचीही साथ होती. २०२४ मध्ये एमआयएमसोबत वंचित नव्हती. त्यामुळे शहरी मते मिळविणे एवढे सोपे नाही, याची जाणीव एमआयएला होती. त्यादृष्टीने मेहनत घेण्यात आली. असदोद्दीन ओवेसी दोनदा शहरात तळ ठोकून होते. शहागंज, आमखास मैदानावर सभा घेतल्या. पूर्व आणि मध्य विधानसभा मतदारसंघात पदयात्रा केल्या. ४२ अंश तापमानात ओवेसी आणि जलील यांनी घाम गाळला होता. शंभर टक्के मुस्लिम मते आपल्या पारड्यात कशा पद्धतीने येतील हे चित्र डोळ्यासमोर ठेवून प्रचार केला. चंद्रकांत खैरे यांना मुस्लिम मते मिळू नयेत म्हणून त्यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दात टीकाही केली.

३३ हजार मते पूर्वीपेक्षा कमी
मतमोजणीनंतर विधानसभानिहाय कोणत्या उमेदवाराला किती मते पडली याची आकडेवारी समोर आली. त्यात मध्य विधानसभेत जलील यांना ८५ हजार ९३७, पूर्वमध्ये ८९ हजार १४३ तर पश्चिम विधानसभेत ५४ हजार ८१७ मते मिळाली. या मतांची बेरीज २ लाख २९ हजार ८९७ एवढी आहे. २०१९ च्या तुलनेत एमआयएम पक्षाला शहराच्या तिन्ही विधानसभा मतदारसंघात तब्बल ३३ हजार १३९ मते कमी मिळाली.

Web Title: Aurangabad Lok Sabha Result 2024: 'MIM' is king in Chhatrapati Sambhajinagar East, Central Assembly!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.