औरंगाबाद मतदारसंघ शिंदेसेनेचाच बालेकिल्ला; खैरेंपेक्षा भुमरेंना १ लाख ८२ हजार मतांची आघाडी

By बापू सोळुंके | Published: June 5, 2024 03:38 PM2024-06-05T15:38:57+5:302024-06-05T15:41:43+5:30

या मतदारसंघावर शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. गत लोकसभा निवडणुकीचा अपवाद वगळता सलग चार निवडणुकांमध्ये खैरे जिंकले होते.

Aurangabad Lok Sabha Result 2024: Lok Sabha Constituency is the stronghold of Shindesena; Sandipan Bhumare has a lead of 1 lakh 82 thousand votes over Chandrakant Khaire | औरंगाबाद मतदारसंघ शिंदेसेनेचाच बालेकिल्ला; खैरेंपेक्षा भुमरेंना १ लाख ८२ हजार मतांची आघाडी

औरंगाबाद मतदारसंघ शिंदेसेनेचाच बालेकिल्ला; खैरेंपेक्षा भुमरेंना १ लाख ८२ हजार मतांची आघाडी

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ आमचाच बालेकिल्ला असल्याचा दावा उद्धवसेना आणि शिंदेसेनेकडून केला जात होता. मात्र, मंगळवारी घोषित झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाने मतदारांनी शिंदेसेनेचे उमेदवार संदीपान भुमरे यांना उद्धवसेनेचे उमेदवार खैरे यांच्यापेक्षा १ लाख ८२ हजार ६८० मतांची आघाडी देत विजयी केले. यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला हा शिंदेसेनेचाच असल्याचे स्पष्ट झाले.

या मतदारसंघावर शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. गत लोकसभा निवडणुकीचा अपवाद वगळता सलग चार निवडणुकांमध्ये खैरे जिंकले होते. गत विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील नऊपैकी सहा विधानसभा मतदारसंघांवर शिवसेनेने वर्चस्व राखले. एवढेच नव्हे, तर महापालिकेवरही शिवसेनेचे ३० वर्षांपासून वर्चस्व राहिले. दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत उभी फूट पडली. 

मतदारसंघातील तीन आमदार हे शिंदेसेनेचे, तर एक उद्धवसेनेचा आणि दोन आमदार भाजपचे आहेत. शिवाय विरोधी पक्षनेते आ. अंबादास दानवे हे शिवसेनेचे नेते तथा जिल्हाप्रमुख आहेत. शिवसेनेतील फुटीपासून दोन्ही सेनांचे नेते मतदारसंघ आमचाच बालेकिल्ला असल्याचा दावा करू लागले. दोन्ही सेनांच्या उमेदवारांनी लोकसभा निवडणूक आमनेसामने लढविली; पण भुमरे यांच्या तुलनेत खैरे यांना मात्र एकाही विधानसभा मतदारसंघात उद्धवसेनेचे पदाधिकारी आणि नेते मतांची आघाडी देऊ शकले नाहीत. 

पश्चिम विधानसभा मतदारसंघात शिंदेसेनेचे आ. संजय शिरसाट यांनी ही निवडणूूक प्रतिष्ठेची करीत भुमरे यांना तब्बल सर्वाधिक ९५ हजार ५८६ मताधिक्य दिले. पश्चिममध्ये खैरे यांना केवळ ५८ हजार ३८२ मते मिळाली, तर जलील यांना ५४ हजार ८१७ मते मिळाली. 

उद्धवसेनेचे जिल्ह्यातील निष्ठावान एकमेव आमदार उदय राजपूत हे त्यांच्या कन्नड विधानसभा मतदारसंघातही खैरेंना लीड देऊ शकले नाहीत. कन्नडमध्ये भुमरे यांना ६८ हजार २३० मते मिळाली, तर खैरे यांना केवळ ४२ हजार ३३८ मतांवर समाधान मानावे लागले. 

‘मध्य’चे आ. प्रदीप जैस्वाल यांनीही भुमरे यांना ५९ हजार ७४० मतांची आघाडी दिली. खैरे यांचे निवासस्थान ‘मध्य’मध्ये आहे. असे असूनही खैरे यांना केवळ ४३ हजार ४८० मतांवर समाधान मानावे लागले. 

पूर्व विधानसभेचे नेतृत्व भाजपचे आ. अतुल सावे करतात. सावे यांनीही भुमरे यांना तब्बल ६३ हजार २२८ मते मिळवून दिली. या मतदारसंघात खैरे यांना केवळ ३८ हजार ३५० मतांवर समाधान मानावे लागले. 

गंगापूर मतदारसंघातील भाजपचे आ. प्रशांत बंब यांनीही मनापासून काम केल्याचे दिसून आले. बंब यांनी भुमरे यांना ९४ हजार ४१९ मते मिळवून दिली. गंगापूरमध्ये खैरे यांना ५३ हजार ११३ मते मिळाली, तर जलील यांना ४८ हजार ५४१ मते मिळाली. शिंदेसेनेचे वैजापूर मतदारसंघातील आ. रमेश बोरनारे यांनीही भुमरे यांना ९३ हजार २३१ मते मिळवून दिली, तर खैरे यांना केवळ ५६ हजार २०७ मते मिळाली.

Web Title: Aurangabad Lok Sabha Result 2024: Lok Sabha Constituency is the stronghold of Shindesena; Sandipan Bhumare has a lead of 1 lakh 82 thousand votes over Chandrakant Khaire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.