जलील-खैरेंचे प्रचारात बरेच अंदाज चुकले; लोकसभा पराभवाला जबाबदार कोण, कारणे काय?

By मुजीब देवणीकर | Published: June 10, 2024 03:13 PM2024-06-10T15:13:13+5:302024-06-10T15:14:15+5:30

Aurangabad Lok Sabha Result 2024: चंद्रकांत खैरे यांनी ज्या ताकदीने निवडणूक लढायला हवी होती, त्या पद्धतीने निवडणूक लढलीच नसल्याचे समोर येत आहे.

Aurangabad Lok Sabha Result 2024: Jalil-Khaire missed many predictions in his campaign; Who is responsible for Lok Sabha defeat, what are the reasons? | जलील-खैरेंचे प्रचारात बरेच अंदाज चुकले; लोकसभा पराभवाला जबाबदार कोण, कारणे काय?

जलील-खैरेंचे प्रचारात बरेच अंदाज चुकले; लोकसभा पराभवाला जबाबदार कोण, कारणे काय?

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात यंदाही तिरंगी लढत झाली. शिंदेसेनेचे उमेदवार संदीपान भुमरे यांना मोठे यश मिळाले. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार ‘एमआयएम’चे इम्तियाज जलील आणि उद्धवसेनेचे चंद्रकांत खैरे यांना पराभवाचा सामना करावा लागला. पराभूत दोन्ही उमेदवारांचे प्रचारातील अंदाज पूर्णपणे चुकले. पराभवाला एक नव्हे तर अनेक कारणे असल्याचे आता समोर येत आहे.

चंद्रकांत खैरे यांनी ज्या ताकदीने निवडणूक लढायला हवी होती, त्या पद्धतीने निवडणूक लढलीच नसल्याचे समोर येत आहे. १९८० ते २००० पर्यंत बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ज्या पद्धतीने निवडणूक लढत असत त्या पद्धतीने निवडणूक लढताना कार्यकर्ते दिसून आले नाहीत. माझी ही शेवटची निवडणूक असल्याचे खैरे यांनी यापूर्वीच जाहीर केले होते. त्याचा किंचितही फायदा त्यांना या निवडणुकीत झाला नाही. खैरे यांच्यासाठी मतदानापूर्वी किमान १५ दिवस अगोदर अत्यंत पोषक वातावरण होते. हे पोषक वातावरण त्यांना ‘कॅश’ करता आले नाही. शिंदेसेनेने राजकारणातील ही पोकळी आपल्या प्रचारतंत्राद्वारे भरून काढल्याचे बोलले जात आहे. या निवडणुकीत रनर अप ठरलेले उमेदवार इम्तियाज जलील यांनी संपूर्ण निवडणूक स्वत:च्या इमेजवर लढण्याचा प्रयत्न केला. मुस्लीम मते तर आपल्याला एकगठ्ठा पडणारच आहेत. विजयासाठी आपल्याला बरीच हिंदू मतेही लागतील, या दृष्टीने प्रचारतंत्र राबविले. त्याचा काही अंशी फायदाही झाला. मुस्लिमांशिवाय अन्य समाजांची मोठ्या प्रमाणात त्यांना मते मिळाल्याचे दिसून येते.

चंद्रकांत खैरे :
१) विकासाचा दृष्टिकोन लोकांपर्यंत गेला नाही. सकारात्मक प्रचारापेक्षा ‘खैरेंनी काय केले....’, ही टॅगलाइन बूमरँग झाली.
२) अनेक वर्षे धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढली. यंदा मशाल चिन्हावर लढले. त्यामुळे पारंपरिक काही मतदार दूर गेले.
३) अतिआत्मविश्वास, मतदारांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्यासाठी धडपड दिसून आली नाही.
४) कार्यकर्त्यांची दुसरी आणि तिसरी फळी निर्माण करण्यात अपयश. महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांचेही दुर्लक्ष.
५) मुस्लिमांना फार जवळ करण्याच्या नादात हिंदू मतदार मोठ्या प्रमाणात दूर गेले.
६) प्रचार यंत्रणाच नव्हती. सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर झाला नाही. ग्रामीण भागावर विसंबून राहणे महागात पडले.

इम्तियाज जलील:
१) ‘वंचित’सोबत असलेली युती तोडणे ‘एमआयएम’ला अत्यंत महागात पडले.
२) काही अंशी नाराज मुस्लिमांची मते महाविकास आघाडीकडे गेली. ती रोखण्यात अपयश.
३) पक्षातील अंतर्गत धुसफूसही काही अंशी कारणीभूत. डॅमेज कंट्रोलमध्ये बरीच शक्ती खर्च.
४) हिंदू मतांसाठी बरीच मेहनत घेतली; पण उपयोग नाही. ‘आदर्श’ आंदोलनाचा फायदा नाही.
५) सोशल मीडियाचा ज्या पद्धतीने उपयोग करायला हवा, तसा करता आला नाही.
६) निवडणूक प्रचारात घेतलेले काही निर्णय अंगलट आल्याचे दिसून येतात.

Web Title: Aurangabad Lok Sabha Result 2024: Jalil-Khaire missed many predictions in his campaign; Who is responsible for Lok Sabha defeat, what are the reasons?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.