छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीच्या (अप) उमेदवाराचे प्रचार कार्यालय पेटविण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 12:40 IST2026-01-07T12:39:16+5:302026-01-07T12:40:45+5:30
शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी तत्परता दाखवल्याने आत झोपलेले १० ते १२ कार्यकर्ते सुखरूप बचावले आहेत.

छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीच्या (अप) उमेदवाराचे प्रचार कार्यालय पेटविण्याचा प्रयत्न
छत्रपती संभाजीनगर: महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराने वेग घेतलेला असतानाच, शहरात एक खळबळजनक घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) चे अधिकृत उमेदवार डॉ. मयूर सोनवणे यांचे प्रचार कार्यालय अज्ञाताने पहाटेच्या सुमारास पेटवून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुदैवाने, शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी तत्परता दाखवल्याने आत झोपलेले १० ते १२ कार्यकर्ते सुखरूप बचावले आहेत.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास अज्ञाताने डॉ. मयूर सोनवणे यांच्या कार्यालयाबाहेरील कपड्याला आग लावली. ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी कार्यालयामध्ये दहा ते बारा कार्यकर्ते गाढ झोपेत होते. शेजारील घरात नळावर पाणी भरणाऱ्या नागरिकांच्या ही आग लक्षात आली. त्यांनी आरडाओरडा करत तातडीने आग विझविली. अन्यथा, मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती.
आम्ही घाबरणार नाही
डॉ. मयूर सोनवणे या घटनेनंतर डॉ. मयूर सोनवणे यांनी जिन्सी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली आहे. "आम्ही गेल्या पाच वर्षांपासून केवळ विकासाच्या मुद्द्यावर तयारी करत आहोत. कुणावरही वैयक्तिक टीका न करता आम्ही मतदारांपर्यंत पोहोचत आहोत. आम्हाला घाबरविण्यासाठी हा प्रयत्न झाला असावा, पण आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून याला प्रत्युत्तर देऊ," असे डॉ. सोनवणे यांनी म्हटले आहे. दरम्यान, जिल्हाध्यक्ष अभिजीत देशमुख यांनीही या घटनेचा निषेध करत, कार्यकर्ते आता अधिक जोमाने कामाला लागतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.