आठवलेंच्या रिपाइंचा मोठा निर्णय; छत्रपती संभाजीनगरात भाजपविरोधात वंचित, शिंदेसेनेस पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 16:24 IST2026-01-06T16:23:39+5:302026-01-06T16:24:08+5:30
आठवलेंनीदेखील भाजपसोबत राहू नये; प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम

आठवलेंच्या रिपाइंचा मोठा निर्णय; छत्रपती संभाजीनगरात भाजपविरोधात वंचित, शिंदेसेनेस पाठिंबा
छत्रपती संभाजीनगर : भाजपसोबत युती असतानाही महापालिका निवडणुकीत रिपाइं (आठवले) ला जागा सोडल्या नाहीत. त्यामुळे स्थानिक पातळीवर युती तोडून भाजपविरुद्ध ज्या प्रभागात शिंदेसेना किंवा वंचित बहुजन आघाडीचा सशक्त उमेदवार असेल, त्यांना बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत रविवारी घेतला, असे पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम यांनी सांगितले.
भाजपने छत्रपती संभाजीनगरच नव्हे, तर राज्यभरात कुठेही रिपाइंला जागा सोडल्या नाहीत. महापालिका निवडणुकीत जर भाजपचा असा पवित्रा असेल, तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत वेगळे काय असू शकेल. त्यामुळे कालच्या बैठकीत एकमताने भाजपसोबत न राहण्याचा निर्णय घेण्यात आला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी काल मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत प्रचाराचा नारळ फोडला, याकडे त्यांचे लक्ष वेधले असता कदम म्हणाले, भाजपसोबतची युती तोडावी, यासाठी रामदास आठवले यांच्यावर राज्य कार्यकारिणी लवकरच दबाव आणणार आहे. भाजपच्या युतीसंदर्भात समाजामध्ये वेगळा मेसेज गेला आहे. त्यामुळे आम्ही आता भाजपसोबत राहणार नाही.
एकदाही चर्चेस बोलावले नाही
आम्ही स्थानिक पातळीवर १५ जागांचा प्रस्ताव भाजपला दिला होता. परंतु, त्यांनी एकदाही आम्हाला चर्चेसाठी बोलावले नाही, शेवटपर्यंत त्यांचा कुणाचाही फोन आला नाही. त्यांनी आमचा विश्वासघात केला आहे. कार्यकर्त्यांचा भ्रमनिराश झाला आहे. त्यामुळे या निवडणुकीत आम्ही भाजपविरोधी भूमिका घेतली असून ‘एमआयएम’ वगळून प्रबळ असलेल्या शिंदेसेना किंवा ‘वंचित’च्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी मैदानात उतरणार आहोत.
बजाजनगरमध्ये रविवारी झालेल्या बैठकीत मिलिंद शेळके, किशोर थोरात, संजय ठोकळ, विजय मगरे, बाळकृष्ण इंगळे, राकेश पंडित, अरविंद अवसरमल, दिलीप पाडमुख आदींसह सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थित होते.