निष्ठवंतांनंतर संभाजीनगर भाजप कार्यालयात रिपाइंचा 'रुद्रावतार'! कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 15:41 IST2025-12-30T15:39:56+5:302025-12-30T15:41:36+5:30
भाजपने शेवटच्या क्षणापर्यंत झुलवत ठेवून एकाही प्रभागातून रिपाइंला उमेदवारी न दिल्याने संताप

निष्ठवंतांनंतर संभाजीनगर भाजप कार्यालयात रिपाइंचा 'रुद्रावतार'! कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
- विकास राऊत
छत्रपती संभाजीनगर: महायुतीमधील जागावाटपाचा तिढा केवळ भाजप-शिंदेसेनेपुरता मर्यादित राहिला नसून, आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) देखील भाजपवर कमालीची संतप्त झाली आहे. भाजपने शेवटच्या क्षणापर्यंत झुलवत ठेवून एकाही प्रभागातून रिपाइंला उमेदवारी न दिल्याचा आरोप करत आज राकेश पंडित आणि संजय ठोकळ यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी भाजपच्या प्रचार कार्यालयात मोठा धिंगाणा घातला. यावेळी एका पदाधिकाऱ्याने अंगावर इंधन ओतून स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली.
अतुल सावे आणि भागवत कराडांविरुद्ध संताप
रिपाइंचे नेते राकेश पंडित आणि संजय ठोकळ यांनी समर्थकांसह भाजप कार्यालयात प्रवेश केला आणि मंत्री अतुल सावे तसेच खासदार डॉ. भागवत कराड यांच्याविरोधात 'मुर्दाबाद'च्या घोषणा दिल्या. "भाजपने आम्हाला मित्रपक्ष म्हणून फक्त वापरून घेतले आणि उमेदवारीच्या वेळी वाटाण्याच्या अक्षता लावल्या," असा आरोप रिपाइं नेत्यांनी केला. संताप इतका टोकाचा होता की, काही कार्यकर्त्यांनी अंगावर रॉकेल ओतून घेण्यास सुरुवात केली, मात्र घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला.
प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन
स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर रिपाइं कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच ठिय्या मांडला. भाजप नेत्यांनी जाणीवपूर्वक रिपाइंला डावलल्याचा दावा यावेळी करण्यात आला. भाजपमध्ये आधीच निष्ठावंतांची बंडाळी सुरू असताना, आता मित्रपक्षानेही आक्रमक पवित्रा घेतल्याने भाजपच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. या आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.