औरंगाबाद जिल्ह्यातील ८८ मतदान केंद्रे संवेदनशील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 15:42 IST2019-04-16T15:31:49+5:302019-04-16T15:42:38+5:30
या संवेदनशील मतदान केंद्रांवर पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा असेल

औरंगाबाद जिल्ह्यातील ८८ मतदान केंद्रे संवेदनशील
औरंगाबाद : जिल्ह्यात तीन मतदान केंद्रे उपद्रवी, तर ८८ मतदान केंद्रे, संवेदनशील आहेत. या संवेदनशील मतदान केंद्रांवर पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा तसेच स्वतंत्र सूक्ष्म निरीक्षकांची नेमणूक केल्याचे निवडणूक उपजिल्हाधिकारी नीलेश श्रींगी यांनी सांगितले.
औरंगाबाद जिल्ह्यात ३०६७ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यापैकी ८८ केंद्रे संवेदनशील असून, यातील ३ केंद्रे उपद्रवी आहेत. मतदान केंद्रांवर प्रमाणापेक्षा कमी मतदान झाले, एकाच उमेदवाराला ७० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान होणे, सिंगल मतदारांची संख्या अधिक असणे, मतदान केंद्राला हिंसाचाराचा इतिहास असेल, तर ती केंद्रे संवेदनशील ठरविण्यात येतात. जिल्ह्यातील संवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्त फौजफाटा तैनात असेल. या केंद्रावर सूक्ष्म निरीक्षक नेमले जातील, त्यांचा अहवाल आयोगाकडे पाठविण्यात येईल. जिल्ह्यामधील ३२३ मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात येईल.
संवेदनशील मतदान केंद्रे
जिल्ह्यातील ८८ संवेदनशील मतदान केंद्रे असून, यापैकी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये ६४, तर २४ जालना मतदारसंघामध्ये येतात. यामध्ये औरंगाबाद पूर्व विधानसभा १८, औरंगाबाद मध्य १३, औरंगाबाद पश्चिम १८, कन्नड ८, गंगापूर ४, वैजापूर ३, सिल्लोड ९, फुलंब्री ९, तर पैठण विधानसभा मतदारसंघामध्ये ७ मतदान केंद्रांचा समावेश आहे.