अब्दुल सत्तारांची ६ कोटी ८५ लाख; तर पत्नीची चार कोटींची मालमत्ता; विरोधात एकूण सहा गुन्हे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 16:30 IST2024-10-24T16:25:26+5:302024-10-24T16:30:48+5:30
उमेेदवार अब्दुल सत्तार यांच्याकडे ५ कोटी ४३ हजार ६५१ रुपयांची जंगम मालमत्ता असून, १ कोटी ८४ लाख ८३ हजार ९५० रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

अब्दुल सत्तारांची ६ कोटी ८५ लाख; तर पत्नीची चार कोटींची मालमत्ता; विरोधात एकूण सहा गुन्हे
सिल्लोड : सिल्लोड विधानसभा मतदारसंघाने महायुतीचे उमेदवार अब्दुल सत्तार यांनी बुधवारी एक अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केला. यासोबत दिलेल्या शपथपत्रात त्यांनी आपल्या स्थावर आणि जंगम मालमत्तेचा तपशील दिला आहे. त्यात त्यांच्याकडे एकूण ६ कोटी ८५ लाख २७ हजार ६०१ रुपयांची मालमत्ता असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
उमेेदवार अब्दुल सत्तार यांच्याकडे ५ कोटी ४३ हजार ६५१ रुपयांची जंगम मालमत्ता असून, १ कोटी ८४ लाख ८३ हजार ९५० रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तसेच त्यांच्या पत्नींच्या नावे ३ कोटी ९७ लाख २९ हजार ९३६ रुपयांची जंगम मालमत्ता असून, ४० लाख ६ हजार ७४० रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. सत्तार यांच्याकडे ३ लाख २० हजार रुपयांची शासकीय देणी असून, त्यांनी ३९ लाख ४९ हजार ३० रुपयांचे बँकेकडून कर्ज घेतले आहे. विविध बँकांमध्ये त्यांनी ६२ लाख २९ हजार ५७० रुपयांच्या ठेवी ठेवल्या आहेत. त्यांच्याकडे ५ लाख ९० हजार ४१६ रुपयांची रोख रक्कम आहे. तसेच १५ तोळे सोने असून, ७ लाख ९१ हजार ५८३ रुपयांचे हिरे त्यांच्याकडे आहेत. तसेच त्यांचे महिंद्रा इंटरप्राइजेस या कंपनीत १२ लाख ५० हजार रुपयांचे, तर विविध सहकारी संस्थांमध्ये २६ हजार ७०५ रुपयांचे, ए एस अजंता कन्स्ट्रक्शनमध्ये २ कोटी ५५ लाख ९२ हजार ८०१ रुपयांचे शेअर्स आहेत. त्यांच्याकडे एक इनोव्हा कार आहे. त्यांचे २०२३-२४ चे एकूण उत्पन्न ९४ लाख ९५ हजार ४५६ रुपये आहे.
एकूण ६ गुन्हे दाखल
सत्तार यांचे शिक्षण १९८४ मध्ये बीए एफवायपर्यंत शिक्षण झाले असून, त्यांच्याविरुद्ध एकूण ६ गुन्हे दाखल आहेत. त्यातील ५ प्रकरणे न्यायालयीन स्तरावर प्रलंबित आहेत, तर पोलिस ठाणे स्तरावर एक प्रकरण प्रलंबित आहे.