लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ
By बापू सोळुंके | Updated: October 22, 2024 18:46 IST2024-10-22T18:45:04+5:302024-10-22T18:46:22+5:30
लोकसभा निवडणुकीत पैसे वाटून त्यांनी माझ्यासारख्या कडवट शिवसैनिकाला पाडले: चंद्रकांत खैरे

लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ
छत्रपती संभाजीनगर: लोकसभा निवडणुकीत पैसे वाटून मते विकत घेण्यात आले, त्यासाठी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या दोन दिवस आधी शिवसेना नेते किरण पावसकर यांनी दिल्ली येथून हवालामार्गे १५-१५ कोटी रुपये पाठविले होते. एवढेच नव्हे तर मुख्यमंत्र्यांच्या विमानातून शहरात ४० कोटी रुपये आणण्यात आले आणि पोलिसांच्या मदतीने त्या पैशांची विल्हेवाट लावण्यात आल्याचा खळबळजनक आरोप उद्धवसेनेनेचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी एका न्यूज चॅनलशी बोलताना केला.
खैरे म्हणाले की, पोलिसांनी खूप मोठ्या नोटा पकडल्याची बातमी न्यूज चॅनलवर पाहिली. हे पैसे यांच्याकडे कोठून येतात, असा सवाल त्यांनी केला. लोकसभा निवडणुकीतही पैसे वाटून त्यांनी माझ्यासारख्या कडवट शिवसैनिकाला पाडले, याचे मला खुप दु:ख होत असल्याचे ते म्हणाले. यात आमचेही लोक होते, असे म्हणत त्यांनी उद्धवसेनेलाही घराचा आहेर दिला.
खैरे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या दोन दिवस आधी आपल्याला दिल्ली येथील मित्राने व्हिडिओ कॉल करून हवालामार्फत पैसे कसे पाठविले जात आहे, हे दाखविले. तेव्हा त्यात किरण पावसकर नोटांच्या बंडलांशेजारी बसलेले होते. याची माहिती शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनाही मिळाली होती. यामुळे तेव्हा त्यांनी या हवाला नोटांची चौकशी करण्याची मागणी केली होती, मात्र चौकशी झाली नाही. लाेकसभा निवडणुकीतही त्यांनी पैशाचा वापर करून मते विकत घेतल्याचा पुनरूच्चार त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी रुपये शहरात आणल्याचे आणि ही रक्कम पोलिस बंदोबस्तात पाठविल्याचे ते म्हणाले. पैसे देऊन मते विकत घेणे योग्य नसल्याचे ते म्हणाले.